नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील छोटा मटका या वाघाने आतापर्यंत तीघांना यमसदनी धाडले. तर याच वाघाने अनेक वाघांसोबत लढाई करुन त्यांना हरवले. व्याघ्रप्रकल्पात आणि प्रामुख्याने ताडोबात या घटना अनेकदा दिसून येतात. मात्र, उपराजधानीत चक्क प्राणीसंग्रहालयातच एक, दोन नाही तर तीन अस्वल एकमेकांशी भिडले. ही लढत एवढी भयंकर होती, की त्यात एकाचा मृत्यू झाला.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात यापूर्वीही पिंजऱ्याच्या दारात बिबट अडकल्याच्या, बाहेरचा बिबट येऊन पिजऱ्यातील बिबट्याला मारल्याच्या, अस्वलाच्या मृत्यूच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, प्राणीसंग्रहालयाची जबाबदारी ज्या अभिरक्षकावर आहे, त्यांनी कधीही या घटनांकडे गांभीर्याने पाहीले नाही.
प्राणीसंग्रहालयात काहीही घडले तरी गोरेवाडा व्यवस्थापनाकडे बोट दाखवायचे, एवढेच काम त्यांच्याकडून केले जाते. एका कंत्राटी कामगारांना कायमकरुन एवढी मोठी जबाबदारी दिल्यानंतर काय घडते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय आहे. जंगलात प्राण्यांमध्ये एकमेकांशी लढाई होते, पण प्राणीसंग्रहालयात लढाई होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणीसंग्रहालय शहरात आहे, पण या प्राणीसंग्रहालयात आजपर्यंत अशी कोणतीही घटना घडलेली नाही. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात चक्क तीन अस्वल एकमेकांशी भिडले. ही लढाई एवढी जोरदार हाती की इतर दोन मोठ्या अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात जबर जखमा झाल्यामुळे अस्वलाचा जीव गेला. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात भारतीय सफारीत एक कक्ष अस्वल सफारीचा आहे. याठिकाणी पाच अस्वले आहेत.
पर्यटकांना सफारीदरम्यान दररोज या अस्वलांचे दर्शन घडते. मंगळवारी सकाळी या पाचपैकी तीन अस्वलांमध्ये भांडण सुरू झाले. यामध्ये, दोन अस्वलांनी एका सहा महिने वयाच्या नर अस्वलावर हल्ला केला. या हल्ल्यात या नर अस्वलाला गंभीर जखमा झाल्या. अस्वलांचे भांडण सुरू झाल्याचे लक्षात येताच प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी बंदिस्त अधिवासाकडे धाव घेतली. अस्वलांच्या भांडणात हस्तक्षेप करीत जखमी अस्वलाची इतर अस्वलांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. या अस्वलाला गोरेवाड्यातील वन्यजीव संशोधन प्रशिक्षण केंद्रात आणण्यात आले. तेथे पशू चिकित्सकांनी त्याला मृत घोषित केले. मोठ्या प्रमाणात अंतर्गत जखमा झाल्याने या अस्वलाचा मृत्यू झाला. मात्र, अस्वलाचे भांडण एवढे विकोपाला जातपर्यंत तेथील कर्मचारी, अभिरक्षक काय करत होते, असा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे. यापूर्वीही बाहेरुन बिबट येऊन प्राणीसंग्रहालयातील बिबट्याला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकदा बाहेरचे बिबट प्राणीसंग्रहालयात येत आहेत. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन ज्या कंत्राटीवरुन कायमस्वरुपी करण्यात आलेल्या अभिरक्षकांकडे सोपवण्यात आले आहे, त्यांची जबाबदारी नेमकी काय, असाही प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे. दरम्यान, मृत्यू झालेल्या अस्वलाचा जन्म प्राणिसंग्रहालयातच झाला होता.