नागपूर : सरकारी अथवा खासगी रुग्णालयात सुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांच्या सेवेला करुणा, ममता, प्रेमाने समाज बघत असतो. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एका घटनेने या सेवेलाच काळीमा फासल्या गेली आहे. गुरूवारी पहाटे एका रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण होण्यापूर्वीच तेथे कार्यरत परिचारिका हातमोजे काढून संपावर निघून गेली. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयातील परिचारिकांनी १७ जुलैच्या सकाळी ८ वाजतापासून संप पुकारला. संपामुळे बऱ्याच नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या. परंतु प्रशासनाकडून आपत्कालीन शस्त्रक्रिया कायम ठेवण्यासाठी धडपट केली जात आहे. मेडिकलच्या आकस्मिक अपघात विभागात घडलेल्या एका घटनेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांसोबत प्रशासनातही खळबळ उडाली. मेडिकल रुग्णालयात एक रुग्ण बुधवारी रात्री उशिरा दाखल झाला. त्यावर तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. पहाटे ६ वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. त्यात काही परिचारिकांचाही समावेश होता. यातील एक परिचारिका संपाचा वेळ झाल्यावर रुग्णाचा विचार न करता संपावर निघून गेली.
शस्त्रक्रिया पूर्ण झाली नसतांनाच परिचारिका संपावर गेल्याचे मेडिकलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांचे धाबे दणाणले. तातडीने दुसरी परिचारिका पाठवून प्रक्रिया पूर्ण केली गेली. दरम्यान, परिचारिका संघटनेकडून मात्र हा प्रकार घडल्याचे वृत्त फेटाळण्यात आले. हा प्रकार आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा संघटनेचा दावा आहे. दरम्यान, संपाला प्रतिसाद मिळत असल्याने मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटीसह इतर रुग्णालयातील सुमारे १५ ते २० नियोजित शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. शुक्रवारपासून संपाचा परिणाम आणखी गंभीर होण्याची शक्यता मेडिकलच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
७५ टक्क्यांहून अधिक परिचारिका सहभागी
मेडिकलमध्ये सुमारे १ हजार परिचारिका, मेयोमध्ये ६०० परिचारिका, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालयासह इतरही वैद्यकीय शिक्षण खात्याच्या रुग्णालयात परिचारिकांची संख्या मोठी आहे. या परिचारिकांनी गुरुवारी एक दिवसीय संप पुकारला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी ८ वाजता परिचारिका संपावर गेल्या. त्यानंतर मुंबई स्तरावर संघटनेची शासनासोबत चर्चा झाली. ही चर्चा फिस्कटल्याने आता बेमुदत संप जाहीर करण्यात आला आहे.
मेडिकलचे अधिकारी काय म्हणतात ?
या प्रकरणाची माहिती घेतली जाईल. रुग्णसेवेबाबत काहीही त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने बीएस्सी नर्सिंगसह सेवेवरील परिचारिकांच्या सेवा लावल्या आहेत. वैद्यकीय विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जात आहे. त्यामुळे रुग्णांना घाबरण्याचे कारण नाही. डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.