यवतमाळ : शैक्षणिक क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या शंतनू देशमुख हत्या प्रकरणात फक्त वरवर फिरणाऱ्या तपासाऐवजी मुळाशी जाऊन मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विविध ३० शैक्षणिक व सामाजिक संघटनांनी केली आहे.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांचा मुलगा शंतनू देशमुख याच्या हत्येच्या निषेधार्थ आज, गुरुवारी स्थानिक सहकार भवन येथे झालेल्या बैठकीत विविध संघटनांच्यावतीने न्यायाची मागणी करण्यात आली. या हत्याकांडात शंतनूची पत्नी निधी देशमुख हिचा सहभाग आहे.
मात्र निधी ही एकटीच या कटात सहभागी आहे की, या हत्याकांडाचा ‘मास्टरमाईंड’ अन्य कोणी आहे, याचाही शोध घ्यावा. निधीने कधीपासून कट रचला होता? तिने शाळेतील विद्यार्थ्यांना या हत्याकांडात वापरले, त्या मुलांशी ती कशी जोडली गेली? त्या मुलांना हा गुन्हा करण्यासाठी कोणते आमिष दाखवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आली नाही, असेही संघटनांनी म्हटले आहे. घटनेत शालेय मुलांचा वापर कसा व का झाला, याचा तपास व्हावा. आरोपी निधीचे मोबाईल चॅट्स, त्या विद्यार्थ्यांसोबतचा संवाद यांचा सखोल तपास व्हावा, केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये. शंतनूच्या कुटुंबीयास न्याय मिळावा आणि हत्याकांडातील पूर्ण सत्य समोर यावे, घटनेतील आरोपी निधी हिच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व संघटनेकडून करण्यात आली. हत्या पूर्वनियोजित होती का? त्यासाठी लहान मुलांना कशा प्रकारे हाताशी धरले गेले? याचा तपास अजूनही झालेला नाही, असा आरोप संघटनांनी केला. फक्त सध्या अटकेत असलेले आरोपी पुरेसे नाहीत, असे मत सर्व संघटनांनी व्यक्त केले.
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व संघटनांनी केली. या हत्येच्या निषेधार्थ व निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणात जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांनी कोणतेही बुरखे घातले असले तरी ते समाजासमोर उघड करावेत, हीच शंतनूला खरी श्रद्धांजली ठरेल, अशी सामूहिक भावना या निवेदनात व्यक्त करण्यात आली. यावेळी मृत शंतनू देशमुख यांच्यासह डॉ. गायत्री सतीश काळे व समीक्षा गौतम आहाटे यांना उपस्थित संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेस ३० पेक्षा अधिक सामाजिक व शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शिक्षक संघटना, पालक मंच, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधींचाही समावेश होता