कारागृहात ओळख परेड, अपहरण, पावणेदोन कोटींची खंडणी प्रकरण

अपहरण आणि पावणेदोन कोटींची खंडणी वसुलीच्या प्रकरणात आरोपींचे रेखाचित्र काढण्यासाठी पोलिसांना असहकार्य करणारे फिर्यादी क्रिकेट बुकी अजय राऊत याने ओळख परेडमध्ये चौघांची ओळख पटविली.

या ओळख परेडमुळे पोलिसांच्या तपासाला अधिक बळकटी आली आहे. ११ डिसेंबर २०१५ रोजी अजय राऊत याचे कॉसमॉस चौकातून जीपमधून अपहरण करण्यात आले होते. राजू भद्रे आणि दिवाकर बबन कोत्तुलवार यांनी हे अपहरण करून खंडणीही वसूल केली होती. त्यानंतर १८ डिसेंबरला राजू भद्रे हा पिंटू शिर्के हत्याकांडाच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाला शरण आला.

२८ डिसेंबर २०१५ ला अजय राऊत याने पोलिसात तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर अजय राऊत हा बरेच दिवस बेपत्ता होता. त्यामुळे पोलिसांना आरोपीऐवजी फिर्यादीलाच शोधण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी नागपूर पोलिसांनी मुंबई, गोव्यापर्यंत मजल मारली. शेवटी पोलिसांनी राऊतच्या एका मित्राच्या सहकार्याने त्याच्यापर्यंत संदेश पाठविला आणि त्याला नागपुरात बोलवून घेतले. महत्प्रयासाने राऊत नागपुरात दाखल झाला. परंतु फिर्यादी म्हणून त्याने पोलिसांना कोणतेच सहकार्य केले नाही. आरोपींचे रेखाचित्र तयार करण्यासाठी अपहरणकर्त्यांचे वर्णन सांगण्यासही नकार दिला, हे विशेष. त्याच्याकडून एकएक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांना त्याच्यावर दबाव टाकावा लागत होता. त्यामुळे पोलिसांना नेहमीच या प्रकरणात फिर्यादीच फितूर होण्याची भीती असते.

तरीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, अनिल कातकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, उपनिरीक्षक सचिन लुले आणि त्यांच्या चमूंनी अथक परिश्रम करून प्रकरणाचा तपास तडीस नेला आणि एक-एक आरोपींना पकडले. अपहरण आणि खंडणी प्रकरणाच्या सर्व कळ्या जोडल्या गेल्यानंतर राजू भद्रे याने दिवाकर कोत्तुलवार यांनीच राऊतचे अपहरण करून त्याच्याकडून पावणेदोन कोटींची खंडणी वसूलल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी गुन्हा कबुलही केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध मोक्का लावला. आता याचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश राऊत करीत आहे. परंतु आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी आणि प्रकरणाला बळकटी देण्यापूर्वी आरोपींची ओळख परेड ही महत्त्वाची प्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया पोलिसांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.

अजय राऊत याचे अपहरण कॉसमॉस चौकातून एका जीप गाडीतून करण्यात आले होते. आरोपी नितीन सुनील वाघमारे, आशीष वीरेंद्र नायडू, भरत उर्फ राहुल सुशील दुबे यांनी राऊतची दुचाकी अडवली आणि त्याला गाडीत घेऊन आले. त्या ठिकाणी दिवाकर कोत्तुलवार बसलेला होता. त्यानंतर राऊतच्या चेहऱ्यावर काळे कापड बांधण्यात आले. तोपर्यंत राऊतने सर्वाचे चेहरे बघितले होते. त्या आधारावर पंधरा दिवसांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष राऊतने २० ते २५ जणांमधून दिवाकर, नितीन, आशीष आणि भरत उर्फ राहुल यांना ओळखले. त्यामुळे या प्रकरणाला अधिक बळकटी मिळाली आहे.