नागपूर : राज्यातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. आधी उन्हाचा कडाका आणि गेल्या दोन आठवड्यात पाऊस आणि आता दिवसा उन्ह आणि सायंकाळी वादळी पाऊस अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे उकाड्यात देखील वाढ झाली आहे. मात्र, याच पावसामुळे शेतीचे नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस मुसळधार आणि वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
पाऊस कशामुळे…
गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मोसमी पाऊस लवकरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाऊस कुठे…
राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच यावेळी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी पुढील चार पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी काही भागांत गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑरेंज व यलो अलर्ट…
दरम्यान, राज्यातील चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर २९ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला या जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी “यलो अलर्ट” जारी केला आहे.