यवतमाळ : इंस्टाग्राम, फेसबुकसारख्या समाज माध्यमांचा वापर अल्पवयीन तरुणींना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी होत असल्याच्या प्रकाराला पुष्टी देणारी घटना यवतमाळात उजेडात आले. या घटनेत नागपुरातील एका अल्पवयीन मुलीवर यवतमाळ येथे सामूहिक अत्याचार करण्यात आले.

एका वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात नागपुरातील दोन तर यवतमाळातील तीन अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन तरुणीशी इन्स्टाग्रामवर मैत्री करून या घटनेला आरोपींनी मूर्तरूप दिले. १६ जुलै रोजी नागपूर येथील हुडकेश्वर भागातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान यवतमाळ शहरातील सेवानगर परिसरातील एका खोली अल्पवयीन तरुणास डांबून ठेवण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेतील जमादार जितेंद्र खोब्रागडे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांनी सेवानगर भागातील घरात डांबून ठेवलेल्या त्या मुलीची सुटका केली.

हुडकेश्वर पोलीस आणि तिच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला. यवतमाळ शहर पोलिसांनी १७ जुलै या अल्पवयीन मुलीस हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात दिले. हुडकेश्वर पोलिसांनी पाचही तरुणांना अटक करून ताब्यात घेतले. गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या प्रकृतीवर औषधे आणि अत्याचाराचा विपरीत परिणाम झाला आहे.

हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून नागपुरातील दोन तरुणांना आणि त्यानंतर यवतमाळातील त्यांच्या साथीदारांना सेवानगर परिसरातून अटक केली आहे. अटकेतील आरोपींची नावे मात्र कळू शकली नाही. या प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून ओळख

ही अल्पवयीन मुलगी इन्स्टाग्रामवरून आरोपींच्या संपर्कात आली. त्यानंतर तिला नागपूर येथून यवतमाळ आणल्या गेले. तिला आणण्यात अन्य कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. तिला गुंगीच्या गोळ्या देऊन आरोपींनी मादनी शिवारातील एका शेतात नेले. त्यानंतर तिथे तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला. या प्रकरणात शेतातील चौकीदारही सहभागी असल्याच्या बोलल्या जात आहे. हे शेत नेमके कोणाचे आणि तो चौकीदार कोण याचा शोध सुरु आहे.