नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित गट-ब) पदासाठी भरती घेण्यात आली. जानेवारी २०२५ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी झाल्यावरही ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ३१ उमेदवार आताही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच होते. लोकसत्ताने या वृत्ताला वाचा फोडल्यानंतर अखेर या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. बुधवारी रात्री २९ उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश आला आहे.
आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांसाठी डिसेंबर २०२३ ला जाहिरात देण्यात आली होती. यानंतर सुधारित आरक्षण निश्चितीसाठी परीक्षेला तीन महिन्यांआधी स्थगिती देण्यात आली होती. यामुळे १८ ऑगस्ट २०२४ रोजी चाळणी परीक्षा होऊन नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ मध्ये मुलाखती पार पडल्या. २८ जानेवारीला निकाल लागला असून सुधारित निकाल ३ एप्रिल रोजी जाहीर झाला. यानंतर आयोगाने शिफारस पत्र दिल्याने कागदपत्र पडताळणी १६ एप्रिल रोजी झाली तर सर्व ३१ उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी आणि चारित्र्य पडताळणी झाल्यावर विभाग पसंतीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्व प्रक्रिया होऊन जवळपास दीड महिना झाला. निवड झालेले उमेदवार नियमित मंत्रालय आणि ओबीसी मंत्री, सचिवांची भेट घेत होते. परंतु, त्यांना नियुक्ती दिली जात न्हवती.
ओबीसी मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांची इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ‘ब’ पदावर लवकरच पदोन्नती होणार आहे. त्यांना ही पदोन्नती देण्यासाठी एमपीएससीकडून निवड झालेल्या ३१ उमेदवारांची नियुक्ती थांबवण्यात आल्याची माहिती होती. त्यामुळे या उमेदवारांमध्ये नाराजी होती. अखेर ओबीसी मंत्रालयाने याची दखल घेत सर्व उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कठीण परीक्षा उत्तीर्ण करून उमदेवारांची निवड होते. त्यानंतरही ओबीसी विभागातील ढिसाळ नियोजनामुळे उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहणे चिंताजनक आहे. शासनाने अखेर आमच्या मागणीची दखल घेऊन सर्व उमेदवारांना नियुक्ती दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. – उमेश कोर्राम, स्टुडंट राईट्स असो.