नागपूर : मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार आणि यादीत बोगस मतदारांचा समावेश यावर संपूर्ण देशभर चर्चा सुरू असून मतदार याद्या योग्य असल्याशिवाय निवडणूक निष्पक्ष होऊ शकणार नसल्याचे मत महाविकास आघाडीतील घटक पक्ष करीत आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. तर नागपूर महापालिकेची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी मतदार यादीचा प्रारुप जनतेसाठी १४ नोव्हेबरला उपलब्ध होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचे प्रारूप १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. एक जुलै २०२५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे ही प्रारूप यादी तयार करण्यात आली आहे. या याद्यांवर हरकती आणि सूचना स्वीकारल्यानंतर ६ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीच्या तारखा अद्याप घोषित झालेल्या नसल्या, तरी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळू लागली आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या कार्यक्रमानुसार, प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर नागरिकांना २२ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. या कालावधीत आलेल्या हरकतींचा निपटारा केल्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

प्रारूप यादीवरील दुरुस्त्या मर्यादित स्वरूपाच्या असतील. यात लेखनिक चुका, चुकीच्या प्रभागातील मतदारांची नावे, विधानसभा मतदार यादीत असलेली पण महापालिकेच्या यादीत वगळलेली नावे, तसेच मृत व्यक्तींची नावे आढळल्यास त्यावरील बदल अधिकृत अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहेत.

अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १२ डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रक्रियेनंतर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयोगाचा कार्यक्रम असा:

मतदार यादी ग्राह्य धरण्याची तारीख – १ जुलै २०२५

प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी – १४ नोव्हेंबर

हरकती व सूचनांचा अंतिम दिवस – २२ नोव्हेंबर

प्रभागनिहाय अंतिम यादी प्रसिद्धी – ६ डिसेंबर

मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी – ८ डिसेंबर

मतदान केंद्रनिहाय यादी – १२ डिसेंबर

या सर्व प्रक्रियेनंतर नागपूर महापालिकेच्या निवडणूक तयारीला अधिकृत वेग मिळणार असून नागरिकांमध्येही मतदार यादीत आपले नाव तपासण्याची उत्सुकता वाढली आहे.