भंडारा : नागपूर नाका ते राजीव गांधी चौकापर्यंतच्या प्रमुख जिल्हा मार्गाला दशकापासून लागलेली घरघर २०२४ मध्ये संपली. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या जिल्हा मार्ग-२१ च्या सिमेंटीकरणासाठी २३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. वर्षापूर्वी निधी मंजूर झाला, निविदा निघाल्या, १६ मार्च २०२४ ला कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन दोन महिन्यानंतर ५ मे २०२४ रोजी कामाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला. हा रस्ता अनेक अडथळ्यांच्या शुक्लकाष्ठातून सुटल्यानंतर काम सुरू झाले, मात्र त्या कामाचाही बट्ट्याबोळ सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका आणि महावितरण या तीन विभागातील कारभाऱ्यांनी केला आहे.

महावितरणचे खांब रस्त्याच्या मधोमध ठेवून दोन्ही बाजूंनी काँक्रिटीकरण करण्याचा उरफाटा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. या १६०० मीटर रस्त्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे. तिरोडा येथील आर्या कंस्ट्रशन या कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १२०० तर दुसऱ्या टप्प्यात ४०० मीटर रस्त्याचे काम करायचे आहे.

पहिल्या टप्प्यातील काम आठ महिन्यापूर्वी ५ मे रोजी सुरू झाले असून मातोश्री हॉस्पिटलपासून सिटी हॉस्पिटलपर्यंत एका बाजूचे ७५० ते ८०० मीटर काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या रस्त्याच्या मधोमध महावितरणचे तब्बल २४ खांब तसेच तीन रोहित्र (डीपी) आल्या आहेत. पुढील कामात अंदाजे ५० ते ६० खांब या कामात येणार आहेत. या खांबांकडे कानाडोळा करीत बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कामात ड्रेनेजलाईनचे काम अजूनही करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका आणि महावितरणमधील असमन्वय आणि नियोजनशुन्य कारभाराचा फटका या कामाला बसला आहे. संथगतीने सुरू असलेले हे काम महिनाभर थंडबस्त्यात होते. त्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले.

रस्ता तयार होऊन वाहतुकीस खुला केल्यास विजेच्या खांबांमुळे अपघाताचा धोका कायम आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी खोब्रागडे यांना विचारणा केली असता ते खांब मी लावले आहेत का? असे उर्मट उत्तर त्यांनी दिले.

या कामासाठी शासनाकडून आतापर्यंत १९ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अद्याप शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. महावितरणच्या खांबामुळे अपघात होऊ नये, यासाठी ‘रेडियम’ लावण्यात आले आहेत. महावितरणने या संदर्भात अंदाजपत्रक दिले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर खांब काढण्यात येणार आहेत. त्रिशाल नागपूरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर ५ जून २०२४ रोजी ३ डिसेंबर २०२४ आपण खांब काढण्यासंदर्भात अंदाजपत्रक दिले होते. त्यानंतर ते का काढण्यात आलेले नाही, याबद्दल कल्पना नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बनसोड, कनिष्ठ अभियंता, महावितरण भंडारा.

नागपूरकडून शहरात येण्यासाठी हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. या मार्गावर अनेक हॉस्पिटल असल्याने रुग्णवाहिका तसेच शाळेच्या बसही याच मार्गाने आवागमन करीत असतात. मात्र, अशा प्रकारे महावितरणचे खांब न काढता काम करण्यात येत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याबाबत उद्या जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आबिद सिद्दीकी, प्रदेश सचिव, भाजप अल्पसंख्याक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश.