नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग, पूल, उड्डाणपूल बांधणीत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय महामार्गासोबत नागपूर शहरात देखील उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. मात्र, काही महिन्यात या पुलांची गुणवत्ता आणि डिझाईनबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागपूर महापालिकेतर्फे गंगाबाई घाट येथील हत्ती नाला पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामामुळे २० ऑगस्ट २०२५ पर्यंत पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक ग्रेट नाग रोडवरुन तसेच वरुन तसेच सेंट्रल ॲव्हेन्यू (सीए) वळण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश काढले आहे.

महापालिकेतर्फे करण्यात आलेला आदेश येत्या २० ऑगस्टपर्यंत अंमलात राहणार आहे. आदेशानुसार हत्ती नाला पुलाचे बांधकाम करण्यासाठी कोणत्याही वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सदर आदेश शहर वाहतुक पोलिस विभागाला या आदेशाचे अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ (मुंबई अधिनियम क्रमांक २२)चे कलम अन्वये वाहतूक नियामाकरिता योग्य ती उपाययोजना करावी लागणार आहे.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या कामात दोष आढळून होता. अवघ्या दोन वर्षांत पूर्व नागपुरातील पारडी उड्डाणपुलात (इतवारी ते भंडारा रोड) दोन स्पॅनमध्ये फट निर्माण झाली आहे. हे उड्डाणपूल ७ किमीचे असून या उड्डाणपुलाचे काम २०१६ मध्ये सुरू झाले होते.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डागडुजी करून पाच महिन्यानंतर मे महिन्यात बुटीबोरी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, आता एक नवीनच समस्या समोर आली आहे. या पुलाच्या दोन गर्डरमध्ये मोठी फट निर्माण झाली आहे. ती वाढून वाहनांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपुलात मोठी फट दिसून येत आहे. यासंदर्भातील चित्रफित प्रसारित झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये या पुलास तडे गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दुरुस्तीनंतर अवघ्या दोन महिन्यात फट निर्माण झाल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता असल्याची चर्चा आहे.

उत्तर नागपुरातील मानकापूर येथील भुयारी मार्ग (अंडर ब्रिज) गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. येथे चार ते पाच फूट पाणी साचले आहे. अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाडी पोलीस ठाणे ते गुरूद्वारापर्यंत उड्डाणपुलास तडे गेले आहे. हा मुख्य पुलापासून वेगळा झालेला सिमेंट कॉक्रीट गोळा पडून लाहन चालकाचा अपघात होण्याची शक्यता आहे. नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील वाडी पोलीस ठाणे ते गुरूद्वारापर्यंतच्या २.३ किलोमीटरच्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू आहे.