नागपूर: मेट्रो शहरांमध्ये हल्ली वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिकांचा मोठा वेळ वाया जातो. सोबतच वाहतूक कोंडीमुळे अनेकदा मानसिक त्रासही सहन करावा लागतो. यामुळे देशातील शहरांमध्ये वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सरकारच्या वतीने मोठ मोठे प्रकल्प राबवले जातात. नागपूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व विकास, शहर व परिसरात होणारी वाहतूक कोंडी विचारात घेता १३ हजार ७४८ कोटींचा आऊटर रिंगरोड व त्यालगत चार ट्रक आणि बस टर्मिनल प्रकल्प, तसेच बीकेसीच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या ६५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपूर महानगर विकास प्राधिकरण संस्था (एनएमआरडीए) च्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. नवीन नागपूर प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन करण्यासाठी ३००० कोटी रुपये व नवीन नागपूर विकसित करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये आवश्यक ३५०० कोटी रुपये, असा एकूण ६५०० कोटींचा खर्च या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे.

या भागातून जाणार नवीन रिंगरोड

नागपूर शहराचा दक्षिण भाग अर्थात अमरावती राष्ट्रीय महामार्ग, हिंगणा राज्यमार्ग, समृद्धी महामार्ग, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, उमरेड राष्ट्रीय महामार्ग, भंडारा राष्ट्रीय महामार्ग, जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला ओलांडून हा नवीन रिंगरोड तयार केला जाणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गासहित अनेक महत्त्वाच्या महामार्गावरील जड वाहतूक या रिंगरोड मार्गे शहराबाहेर जाईल. नागपूरमधील हा तिसरा रिंगरोड ९ तालुक्यांमधील ९९ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.

नवीन नागपूर प्रकल्प काय आहे

मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर मिहान प्रकल्प आणि बुटीबोरी औद्योगिक क्षेत्राजवळ नवीन नागपूर विकसित करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवीन नागपूर १,७८० एकर जागेत प्रस्तावित आहे. भविष्यकाली शहर असेल. स्टार्टअप्स, एमएसएमई, तंत्रज्ञान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय सेवा प्रदात्यांसाठी एक केंद्र असेल. देश-विदेशातील कॉर्पोरेट कंपन्या ऑफिसेस यांना आकर्षित केले जाणार आहे. ६ हजार ५०० कोटीचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे.

६९२.०६ हे. आर मध्ये नवीन नागपूर

वर्धा मार्गावरील मिहान, समृद्धी एक्स्प्रेसवे आणि बुटीबोरी औद्योगिक परिसराच्या शेजारी असलेल्या हिंगणा तालुक्यातील गोधणी (रिठी) आणि लाडगाव (रिठी) या ठिकाणी ६९२.०६ हे. आर जागेवर नवीन नागपूर प्रस्तावित आहे. मुंबईतील बीकेसी हे राज्यासह देशातील एक प्रमुख केंद्रीय व्यापार जिल्हा (सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीक) आहे. त्याच धर्तीवर नवीन नागपूरही व्यापाराचे केंद्र उभारण्याचा प्रयत्न आहे.