नागपूर: प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचे राहते घर असावे अशी इच्छा असते. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. आताच्या महागाईच्या काळात विविध वस्तूंसह जागेचे वाढलेले दर बघता अनेकांचे घराचे स्वप्न पुर्ण होऊ शकत नाही. दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केवळ ५ लाखात आयुष्यभर वीज-पाणी नि:शुल्क असलेल्या घराच्या योजनेबाबत सांगितले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, मी स्मार्ट व्हिलेजमध्ये या पद्धतीचे घर देण्याच्या योजनेवर काम करत आहो. त्यात १ हजार चौरस फुटाचा प्लाॅटवर ५०० चौरस फुटाचे बांधकाम असेल. या घरात सौर उर्जेसह इतरही पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून आयुष्यभर घर मालकाला वीज-पाणीही नि:शुल्क मिळेल. या घराची किंमत केवळ ५ लाख रुपये असेल. सुरवातीला सरकारी संस्था असलेल्या म्हाडातर्फे हे घर बांधण्याचा विचार होता.

दरम्यान म्हाडाच्या अधिकाऱ्यांना ५ लाखात घर द्यायची इच्छा असल्याचे सांगितल्यावर त्यांनी केवळ १ हजार चौरस फुटाच्या दरात घर बसू शकत नाही. आमचे प्रति चौरस फुट दर २ हजाराहून जास्त असल्याचे सांगितले. त्यावर मी खासगी आर्टिटेक्ट व कंत्राटदार नियुक्त केले. त्याला घरासाठी कोणते साहित्याचा वापर करायचा, त्याबाबतच्या सूचना दिल्या. चीनवरून अत्यल्प दरात भिंत तयार करणारी अद्यावत यंत्र आणले. या यंत्राद्वारे कमी दरात घर तयार होणे शक्य आहे.

माझ्या धापेवाडातील घराचे ३ स्लॅपही या चीनच्या यंत्राद्वारे तयार केले असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. विकसीत भारत योजनेअंतर्गत या पद्धतीने अत्यल्प दरात सर्वोत्तम दर्जाचे घर गरीब व मध्यमर्गीयांना मिळायला हवे, असेही गडकरी यांनी सांगितले. त्यासाठी देशातील अभियंत्यांनी बांधकाम क्षेत्रातील संशोधनासह विविध स्तरावर काम करण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

सविस्तर प्रकल्प अहवालात घोळ

शासकीय यंत्रणेत इमारत वा प्रकल्पाची उभारणी करतांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) बघणे आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे चुकीचे डीपीआर करून प्रथम मंजूरी घेतली जाते. त्यानंतर त्यात सुधारणा व प्रकल्पाची किंमत वाढवली जाते. या घोळात प्रकल्प लांबतो. त्यामुळे प्रकल्पाला मंजूरी देण्यापूर्वीच डीपीआरकडे विशेष लक्ष देऊन ते चांगल्या आर्टिटेक्टकडून तयार करण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले. चांगल्या दर्जेदार कामासाठी आम्ही कंत्राटातून कमित- कमीची मर्यादा काढल्याचेही त्यांनी सांगितले.