नागपूर : मतदार यादीतील घोळ, बोगस मतदारांची नोंद आणि अनेक पात्र नागरिकांची नावे वगळण्याच्या प्रकारांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडूनही यावर जोरदार आवाज उठवण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रारी सादर करण्यात आल्या असून, आयोगाने अद्याप समाधानकारक उत्तर दिलेले नाही, अशी टीका करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे ही यादी तयार केली जात आहे. यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विरोधकांनी मतदार यादीतील पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी केली असून, नागरिकांनीही यादीतील आपली नावे काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील प्रमुख महानगरपालिका निवडणुकांपैकी एक असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक तयारीला वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नागपूर महापालिकेसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार, येत्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आधीच अंतिम करण्यात आली आहे. आता १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येत आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर नागरिकांना हरकती व सूचना नोंदवण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दिली जाणार आहे. त्यानंतर, प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून २८ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदार यादीतील गोंधळाचे प्रकार उघडकीस आले होते. काही ठिकाणी मतदारसंख्येत अचानक वाढ, तर काही ठिकाणी नावे गहाळ होण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. त्यामुळे यंदा यादी तयार करताना अधिक काटेकोरपणे प्रक्रिया राबवण्यात येत आहे. प्रारूप यादीवर नागरिकांनी तक्रारी केल्यास त्या तपासून योग्य त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही. त्याऐवजी, विधानसभेच्या यादीचा आधार घेत प्रभागनिहाय यादी तयार केली जाते. याद्वारे महापालिकेच्या निवडणुकीतील पारदर्शकता आणि अचूकता राखली जाणार आहे.
यापुढील टप्प्यात, ४ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांची यादी, तर १० डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदारांनी आपली नावे यादीत तपासून आवश्यक असल्यास हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन नागपूर महापालिकेकडून करण्यात आले आहे. योग्य आणि अद्ययावत मतदार यादी हा निवडणुकीच्या पारदर्शकतेचा मुख्य आधार असल्यामुळे या प्रक्रियेकडे नागरिकांनी गांभीर्याने पाहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.