नागपूर : लहान मुले असलेल्या घरातल्या वक्ती आपल्या लेकरांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्याला साधे खरचटले, ठेच लागली तरी मायबापांच्या काळजात धस्स होते. बाहेर खेळणारे लेकरू सुरक्षित घरी येईपर्यंत मायबापांच्या जीवाला अगदी घोर लागलेला असतो. शालेय जीवनात आपल्याला ज्या ज्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला, ती वेळ पोटच्या पोरावर येऊ नये म्हणून मायबाप मुलांचे हवे ते लाड करतात. मात्र लेकरांचे वाट्टेल ते हट्ट पुरविणारे आपल्याच काळजाचा तुकडा नजरेआड शाळेत पाठविताना इतका निष्काळजीपणा कसा करू शकतात आणि त्यात आपलेच लाडके लेकरू इतक्या सहजतेने धोक्यात कसे घालू शकतात, असा प्रश्न आता पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू होऊन जेमतेम दिवसही उलटला नाही तोच शाळेच्या अगदी दुसऱ्याच दिवशी मुलांना शाळेच्या दरवाज्यापर्यंत आणून सोडणाऱ्या बेशिस्त स्कूल बस चालकांना नियमांची आठवण करून देण्याची वेळ मंगळवारी पोलिसांवर आली. चौका चौकात शहर वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या १६१ बेशिस्त वाहनांवर कारवाईचा दंडुका उगारत मुलांच्या वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला आहे.
लेकरू सोपवणे पुरेसे आहे का….
शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ज्या कारणांमुळे या स्कूल व्हॅन चालकांवर कारवाई केली, ती कारणे देखील गंभीर आहेत. विना गणवेश, विना सिटबिल्ट, क्षमतेपेक्षा अतिरिक्त विद्यार्थी, वाहतूक सिग्नलचे पालन न करणे या सारख्या कलमांखाली मोटर वाहन कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे व्हॅन चालकाच्या ताब्यात सोपवून शाळेकडे निघालेले लेकरू, काळजाचा तुकडा खरेच सुरक्षित आहे, का हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
मायबापांनो हे पहा वास्तव….
वाहतूकीचे नियम भंग करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांमध्ये सर्वाधिक ४३ कारवाया या लकडगंज झोनमध्ये करण्यात आल्या. यात २२ स्कूल बस आणि शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या १५ ऑटो चालकांसह ६ नामांकित शाळांच्या स्कूल व्हॅनवर कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल इंदो झोनमध्ये २२ स्कूल बस, २ ऑटो आणि १ स्कूल व्हॅन अशा २५ वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली. वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहत पसिसरातल्या शाळांमध्ये मुलांची वाहतूक करणाऱ्या १२ स्कूल बस, शाळांच्या अधिकृत ८ स्कूल व्हॅन अशा २० वाहनांवर दंडुका उगारण्यात आला. सदर सारख्या गजबजलेल्या परिसरात शाळकरी मुलांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या ९ स्कूल बस, शाळांच्या २ बसेस आणि ७ ऑटोचालक अशा १८ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सोनेगाव परिसरतही ५ स्कूल बस, शाळांच्या ४ स्कूल व्हॅन आणि २ ऑटोचालक अशा ११ वाहनधारकांना पोलिसांनी नियम दाखवून दिले. या व्यतिरिक्त शहरातल्या सिताबर्डी, अजनी, सक्करदरा, कामठी अशा सर्वच पोलिस झोनमध्ये वाहतूक पोलिसांनी शाळकरी मुलांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.