नागपूर : मुलगी एका वर्षांची असतानाच पतीचे आजाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर महिलेने एका वर्षाच्या मुलीचे पालन-पोषण केले आणि नोकरीवर लावले. मात्र, तिच्या प्रेमसंबंधास विरोध केल्यामुळे मायलेकीत दुरावा निर्माण झाला. तब्बल दहा वर्षे मायलेकी एकमेकींपासून दूर राहू लागल्या. मुलीच्या विरहात आईने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलिसांनी मुलीचे समूपदेशन करुन दोघीही मायलेकीची पुण्यात भेट घालून दिली. यावेळी आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तर मुलीचा आनंद गगनात मावत नव्हता.

स्मिता (बदललेले नाव) या शासकीय बँकेत व्यवस्थापक पदावर नोकरीवर तर त्यांचे पती शासकीय सेवेत होते. सुखी संसार सुरु असतानाच पतीचे आजारपणामुळे निधन झाले. त्यावेळी स्मिता यांना एका वर्षाची मुलगी स्विटी (बदललेले नाव) होती. पतीच्या निधनानंतर स्मिता यांनी नोकरी सांभाळून मुलीचे पालन-पोषण केले. मुलगी अभियंता झाल्यानंतर ती पुण्यात मोठ्या आयटी कंपनीत नोकरीवर लागली. यादरम्यान, स्विटीचे कार्यालयातील एका सहकारी अभियंता तरुणावर प्रेम जडले. जवळपास दोघांचे चार वर्षे प्रेमसंबंध होते. एकाच कंपनीत नोकरीवर असल्यामुळे दोघांनी मिळून एकच घर भाड्याने घेतले होते. दुसरीकडे स्मिता यांनी काही नातेवाईकांकडे मुलीच्या लग्नासाठी मुलगा शोधण्यासाठी तगादा लावला. याबाबत स्विटीलाही आईने कल्पना दिली. मात्र, तिने आईला लग्न करण्यास नकार दिला. माझे एका सहकारी मित्रावर प्रेम असून मला त्याच्यासोबत प्रेमविवाह करायचा आहे, असे थेट मुलीने आईला सांगितले. त्यामुळे आईच्या पायाखालची वाळू सरकली.

हेही वाचा…गृहमंत्री शहा यांचा दौऱ्यात नक्सली एलिमेंट नजरेत,शहा चहा घेत नाही म्हणून मग,,,

प्रेमविवाहास विरोध अन् नात्याची ताटातूट

मुलीने प्रेमसंबंध असलेल्या युवकाशी लग्न करण्याचा हट्ट धरला तर आईने लग्नास विरोध केला. मायलेकींमध्ये वाद झाला. दोघींत अबोला झाला. मुलीने प्रेमविवाह केला तर आईने मुलीशी संबंध संपवले. नागपुरात वृद्ध आई एकाकी जीवन जगत होती तर मुलगी पुण्यात आपला संसार सांभाळून नोकरी करीत होती. अशाप्रकारे मायलेकीच्या नात्याची तब्बल दहा वर्षे ताटातूट झाली.

हेही वाचा…VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरोसा सेलने घडवली मायलेकीचे मनोमिलन

वृद्ध आई सतत आजारी राहायला लागली. मुलीच्या विरहात ती रडत असायची. तिला एका नातेवाईकाने भरोसा सेलमध्ये नेले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी स्मिता यांच्याशी संवाद साधला. समूपदेशक जयमाला डोंगरे यांनी प्रथम वृद्धेचे समूपदेशन केले. तसेच पुण्यात राहणाऱ्या मुलीचे समूपदेशन केले. दोघीही मायलेकींची भेट व्हावी म्हणून पोलीस निरीक्षक सूर्वे यांनी पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याची मदत घेतली. त्या अधिकाऱ्यांच्या कक्षातच दोघेही मायलेकीची भेट झाली. दोघींनी एकमेकींना मिठीत घट्ट धरुन अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. मुलीने आईची काळजी घेण्याचे पोलिसांना आश्वासन दिले. तिने आईला स्वतःच्या घरी नेले.