नागपूर : कुख्यात लोखंड व्यापारी संतोष उर्फ बंटी रामपाल शाहू आणि राजदिप उर्फ गोल्डी शाहू या दोघांच्या अडचणीत गुरुवारी आणखी वाढ झाली. या दोघांनी बंदुकीच्या धाकावर ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात लकडगंज पोलीसांनी नवा गुन्हा दाखल करत चौकशीसाठी त्याला ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

बनावट कागदपत्रांच्या आधारे सुधार प्रन्यासचा भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणारा बंटी शाहू सध्या सदर पोलिसांच्या कोठडीत आहे. दोनच दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्यावर कट रचत सुधार प्रन्यासचा भुखंड लाटण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ताजी असतानाच बंटी शाहू आणि त्याचा साथीदार राजदीप उर्फ गोल्डी शाहू या दोघांनी बंदूकीचा धाक दाखवत आपल्याला ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आशयाची तक्रार लोखंड व्यावसायिक चंद्रशेखर शिवशरण प्रजापती (३८) यांनी केल्याने पोलिसांनी शाहू विरोधात खंडणीचा नवा गुन्हा दाखल केला.

नेमके काय घडले…

प्रजापती यांनी २०१८ मध्ये गोपिचंद तोतवानी यांच्याकडून बगडगंज भागात भुखंड क्रमांक ४४, ए विकत घेतला होता. त्या संदर्भात दोन्ही पक्षांत करारनामाही झाला. दुय्यम निबंध कार्यालयात नोंदणीपूर्वीच २०२३ मध्ये गोपिचंद यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलगा गोलू तोतवानी हे नोंदणी करुन देण्यासाठी तयार झाले. मात्र हा भूखंडावर आणि दुकानावर बंटी शाहूची नजर गेली. यातूनच बंटी आणि गोल्डीने २५ मे २०२० ला दुकान खाली कर, हा भूखंड मी विकत घेतला आहे. अशी धमकी देऊन पिस्तूल दाखवली. जर हा भूखंड हवा असेल तर ६० लाख द्यावे लागतील, अशी खंडणीही दोघांनी मागितली होती. पोलिसांत गेल्यास ठार करु, अशी धमकी देऊन दोघे निघून गेले. असेही प्रजापतींनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

पाच वर्षांनंतर कुठून आले हत्तीचे बळ ?

पोलीस अधिकारी आपल्याला दीड कोटींची मागणी करतात, अशी तक्रार करत बंटी शाहूच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालय हादरवून सोडले होते. तेव्हापासून सावध पवित्रा घेत पोलीसांनी बंटी विरुद्ध प्रलंबीत तक्रारी निकाली काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. गुन्हे शाखेने दोनच दिवसांपूर्वी सदर पोलीस ठाण्यात बंटी शाहू आणि त्याच्या भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर लगेच गुरुवारी बंटी आणि गोल्डी शाहूविरुद्ध खंडणीचा नवा गुन्हा दाखल झाला. वास्तविक खंडणी आणि धमकीची ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली आहे. त्यावर तक्रारदार आतापर्यंत घाबरला होता. त्यामुळे पाच वर्षांमध्ये एकदाही पोलीस ठाण्याची साधी पायरीही न चढलेल्या तक्रारदाराच्या अंगात चक्क शाहू भावंडाच्या गुन्हेगारी साम्राज्याला खिंडार पाडण्यासाठी आताच हत्तीचे बळ कुठून आले, अशी शंकाही त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.