नागपूर : छत्तीसगडमधील पाच वर्षीय मुलीचे कारने अपहरण झाल्याची सूचना नागपूर पोलिसांना मिळाली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी धावपळ करीत ठिकठिकाणी नाकाबंदी करीत अपहरणकर्त्याच्या कारचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा वापर करत सक्करदऱ्यातून त्या संशयित कारला अडविले.
मात्र कारमध्ये युवकासोबत एक विवाहित तरुणी होती. ज्या मुलीच्या अपहरणावरून गोंधळ उडाला होता ती मुलगी तिचीच असल्याची माहिती समोर आली. केवळ अपहरण झाल्याच्या एका अफवेमुळे नागपूर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
१३ मे दुपारी एक वाजता नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला मुलीच्या अपहरणाबाबत सूचना मिळाली. अपहरणकर्ते डोंगरगडमधील पाच वर्षीय मुलीला पांढऱ्या रंगाच्या कारमधून घेऊन निघाले असून त्यांनी देवरी सीमेवरील बॅरिकेट्स उडविले असल्याचे सांगण्यात आले. सीजी-०४ सिरीजची कार असल्याने पोलिसांनी नाकाबंदी लावली. सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना ती कार नंदनवन, सक्करदरा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी गाडी अडविली व त्यात एक युवक व विवाहित तरुणी होती. तिला मुलीबाबत विचारणा केली. ‘मला दोन मुली असून दोन्ही मुली डोंगरगढला माहेरी आहेत.’ असे सांगितले. त्यामुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या महिलेचे १३ वर्षांअगोदर नागपुरात मोबाईल दुरुस्त करणाऱ्या युवकासोबत लग्न झाले होते. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती महिन्यापूर्वी दोन्ही मुलींना घेऊन डोंगरगड येथे माहेरी निघून गेली होती.
मात्र माहेरीदेखील पटत नसल्याने तिने नागपुरातील एका मित्राला फोन करून डोंगरगडला बोलविले. कुटुंबियांना न सांगता दोघेही कारने नागपुरकडे निघाले. माहेरच्या लोकांना ती दिसली असता त्यांनी दुसऱ्या कारने तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे देवरी सीमेवर बॅरिकेट्स तोडून कार समोर निघाली. तिने तिच्या दोन्ही मुली डोंगरगडला आजीकडेच असल्याचे स्पष्ट केले. हिवरे यांनी डोंगरगड येथील पोलीस निरीक्षकांना विचारणा केली असता मुली आजीकडेच असल्याची खात्री झाली. डोंगरगडमध्ये कुठल्याही अपहरणाची नोंद नव्हती. महिलेच्या नातेवाईकांनी देवरी सीमेवर अपहरणाचा कांगावा केला होता व त्यातून हा सगळा गोंधळ निर्माण झाला. हा खरा प्रकार समोर आल्यावर नागपुरातील पोलीस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्यासोबत पोलीस हवालदार मुकुंद ठाकरे, प्रविण वाकळे, शेरकर यांच्या पथकाने त्या कारचा शोध घेतला.