नागपूर : घरातून चोरी झालेले पैसे आणि दागिने परत मिळतील, अशी आशा कोणालाच नसते. तसेच सायबर गुन्हेगारांनी गंडा घातल्यानंतर त्यांच्या तावडीतून पैसे परत आणणे हे देखील मोठे जिकरीचे काम असते. त्यामुळे अनेक जण तक्रारसुद्धा देत नाहीत. मात्र, नागपूर पोलिसांनी गेल्या वर्षभरात तब्बल ८० गुन्ह्यांचा छडा लावून चोरी गेलेला ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तक्रारदारांना मुद्देमाल परत केला. यावेळी उपस्थित फिर्यादींनी कृतज्ञता व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले.

शहरात चोरी, घरफोडी, लुबाडणूक आणि सायबर गुन्हेगारांनी केलेली फसवणूक, यांसह अन्य गुन्ह्यांत अनेक तक्रारदारांचे पैसे, मुद्देमाल, सोने-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरी जातात. एकदा का घरातील ऐवज आणि पैसे चोरी गेले की ते परत मिळण्याची आशा नसते. अनेकदा चोरी किंवा घरफोडी झाल्यानंतर पोलीस संथगतीने तपास करतात. तक्रारदारांनी विचारणा केल्यानंतर व्यवस्थित आणि समाधानकारक उत्तर देत नाहीत. त्यामुळे अनेक तक्रारदारांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असतो. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फिर्यादींशी आरेरावीने बोलतात आणि उलटतपासणी करतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही फिर्यादी अनेकदा पोलीस ठाण्यात जात नाहीत. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे अनेक तक्रारदार नाराज असतात. अशातही गेल्या वर्षभरात झालेल्या घरफोड्या, चोऱ्या आणि फसवणुकीसह अन्य घटनांमध्ये पोलिसांनी व्यवस्थित तपास करीत आरोपींच्या ताब्यातून ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा…सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या प्रतिमा पूजनावरून वाद! राज्य शासनाच्या ‘या’ निर्णयाला विरोध…

‘प्रत्येक तक्रारींवर पोलीस गांभीर्याने तपास करीत असतात. आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करीत असतात. अशा कार्यामुळे पोलिसांची प्रतिमा उजळते आणि पोलिसांवरील विश्वास वाढतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी केले.

हेही वाचा…भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…अन् आईच्या डोळ्यात अश्रू तरळले

चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळेल, याची खात्री नव्हती. परंतु, पोलीस ठाण्यातून फोन आला आणि तुमच्या घरातून चोरी गेलेले सर्व दागिने चोरट्यांकडून जप्त केल्याची माहिती एका पोलीस काकांनी दिली. हे ऐकताच माझ्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. आता माझा पोलिसांवरील विश्वास वाढला असून आम्हाला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवानी नावाच्या तरुणीने दिली.