नागपूर रेल्वेस्थानकाची दुरवस्था; घोषणा जागतिक दर्जाची, पण सुविधा ‘अ’ श्रेणीच्याही नाहीत

देशाच्या चारही दिशांना रेल्वेगाडय़ांची वर्दळ नागपूर स्थानकावरून होत असल्याने या स्थानकाला जागतिक दर्जाचे (वल्र्ड क्लास) विकसित करण्याची घोषणा झाली खरी, पण ‘अ’ श्रेणीतील (‘ए’ क्लास)च्या स्थानकासाठी असलेल्या सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत.

नागपूर स्थानकाचा ‘अ’ श्रेणीत समावेश आहे. स्थानकाची श्रेणी ही त्या स्थानकावरील तिकीट विक्रीवरून निश्चित केली जाते. वर्षभरात ६ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक तिकीट विक्री होत असल्यास त्या रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणी दिली जाते. त्यापेक्षा कमी तिकीट विक्री असलेल्या स्थानकाला ‘ब’ श्रेणी दिली. दर पाच वर्षांनी श्रेणी अद्ययावत केली जाते. स्थानकाच्या श्रेणीनुसार प्रवासी सुविधा देणे आवश्यक असते. रेल्वे मंत्रालयाने नऊ वर्षांपूर्वी नागपूरला ‘वर्ल्ड क्लास’ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. त्याचे पुढे काही झाले नाही, परंतु ‘अ’ श्रेणी स्थानकाच्या सुविधाही उपलब्ध नाहीत. विद्यमान सरकारचा पायाभूत सुविधांवर भर आहे. त्यांच्या घोषणा आणि नागपूर स्थानकांवरील सुविधा यांच्यात मेळ अद्याप बसलेला नाही, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला म्हणाले.

नागपूर स्थानकावरील तिकीट विक्रीच अधिक नाही तर येथून दररोज ये-जा करणाऱ्या गाडय़ांची संख्या १०० ते सव्वाशेच्या घरात आहेत. बहुतांश गाडय़ा लांब पल्ल्यांच्या असतात. प्रवासादरम्यान काहीही समस्या निर्माण झाल्यास नागपुरात गाडी थांबवली जाते. प्रवाशांना आरोग्य सुविधा असो वा एसी बंद किंवा डब्यातील पाणी संपलेले असो, गाडय़ा नागपूरला थांबवण्यात येतात. देशभरातील रेल्वेगाडय़ांसाठी नागपूर हे आपत्कालीन स्थानक झाले आहे. असे असताना आणि ‘अ’ श्रेणीत येत असताना नागपूर स्थानकावर वैद्यकीय सुविधा नाही. ‘अ’ श्रेणीतील स्थानकावर चोवीस तास डॉक्टर, औषधाचे दुकान असणे आवश्यक आहे. प्रवाशांची गर्दी बघता बहुमजली वाहनतळ असायला हवे. ‘यात्री निवास’ नाही. गेल्या वर्षांपासून नागपूर स्थानकाची सुविधा महत्त्वाची असल्याचे आणि हे स्थानक संवेदनशील असल्याचे सांगत ३६० सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, हे कॅमेरे आले नाहीत, शिवाय रेल्वेच्या सभोवताल असलेले प्रवेशद्वार बंद करण्यात आले नाही. प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात राहत नाही. मनुष्यबळाअभावी मानवरहित अत्याधुनिक प्रवेशद्वार विकसित करण्याची योजनाही अद्याप अंमलात यायची आहे.

मानवरहित प्रवेशद्वारावर स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव आहे. नागपुरात वैद्यकीय सेवेकरिता देशभरातून लोक येत असतात. या रुग्णांना पादचारी पुलांवरून चढणे-उतरणे आणि गाडीपर्यंत पोहोचणे अडचणीचे ठरते. त्यांच्यासाठी आणि वयोवृद्ध प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने प्रत्येक फलाटावर एक उद्वाहक (लिफ्ट) असणे आवश्यक आहे. ते मंजूर झाल्याचेही सांगण्यात येते, परंतु आठ फलाटांपैकी एकाही स्थानकावर उद्वाहक बसवण्यात आलेले नाही. सेवाग्राम रेल्वेस्थानकावर दोन आणि भुसावळ रेल्वेस्थानकावर उद्वाहक बसवण्यात आले. मात्र ‘अ’ श्रेणीतील नागपूर स्थानकावर उद्वाहक नाहीत.

प्रवासी घसरून पडतात

नागपूर स्थानकावर फलाट क्रमांक १ वर नव्याने बसवण्यात आलेल्या ‘टाईल्स’वरून घसरून दररोज किमान १० ते १५ प्रवासी पडतात. फलाट क्रमांक १ वर मुंबई एण्डला असलेल्या पादचारी पुलांवरून उतरताना किंवा चढताना महिला पडतात, असे रेल्वेस्थानकावरील रेल्वे कर्मचारी सांगतात.