नागपूर : सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शहर आणि ग्रामीण भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साप देखील बिळातून बाहेर पडले असून गेल्या १३ दिवसांत बारा जणांना सर्पदंश झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर बिळात पाणी गेल्यामुळे साप बाहेर निघतात. विशेषतः ग्रामीण भागात साप अधिक दृष्टीस पडतात. शेतात काम करताना किंवा रस्त्याने जाताना कधी घरामध्येच सापाने दंश करण्याचे प्रकार घडतात. २६ जून ते आठ जुलै या तेरा दिवसांमध्ये जिल्ह्यात बारा जणांना सापाने दंश केला. यापैकी एकजण नागपुरातील नंदनवन भागातील, तर उर्वरित नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत.
ग्रामीण भागात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असल्याने तेथे यावरील औषधोपचार सज्ज ठेवण्याची गरज आहे. थोडी काळजी घेतली तर सर्पदंश टाळता येऊ शकतो, असे सर्पमित्रांनी सांगितले. साप दिसल्यास त्वरित जवळच्या सर्पमित्राशी संपर्क साधावा. साप अडचणीच्या जागी जाऊ नये याची काळजी घ्यावी. साप पकडण्याचा प्रयत्न करू नये. चावलेल्या भागाची हालचाल करू नये. मांत्रिकाकडे न जाता थेट सरकारी दवाखान्यात जावे. दंश झालेल्या जागेवर चीरा मारणे किंवा पट्टी बांधणे करू नये. डॉक्टरांना सर्पाबाबत अचूक माहिती द्यावी. असेही भांदक्कर यांनी सांगितले.
विषारी साप व त्यांच्या दंशाची लक्षणे
नाग: चाव्याच्या ठिकाणी वेदना होतात. सूज, डोळे बंद होणे, लालसरपणा, मळमळ, उलटी. श्वास घेताना अडथळा, अशक्तपणा, कुठल्याही वस्तू दोन दिसणे, चक्कर इत्यादी.
मण्यार : दंशाचे चिन्ह दिसत नाही. पोटदुखी, खांदेदखी, छाती आणि पाठ दुखणे, डोळे लागणे, श्वास घेताना त्रास होतो.
घोणस : रक्तस्राव जास्त होतो. सूज जास्त असते. चावलेल्या ठिकाणी जळजळ होते , लालसरपणा येतो.
फरसे : तत्काळ वेदना, सूज, जळजळ, जास्त त्रास झाल्यास गुदद्वारातून रक्तस्राव, रक्त गोठण्याची समस्या व त्वचेवर पुरळ.