नागपूर : ‘सर्वोदय व काँग्रेस ही महात्मा गांधींची वैचारिक अपत्ये आहेत. त्यामुळे त्या दोघांचे नाते हे सहोदरांचे आहे’ – असे स्पष्ट मत सर्वोदयाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय प्र. दिवाण यांनी व्यक्त केले आहे आणि आजच्या राजकीय संघर्षात या सहोदरांच्या एकतेचे महत्व असल्याचे म्हटले आहे.नागपूर ते सेवाग्राम दरम्यान २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’त सर्वोदय व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सर्वोदय व काँग्रेस सहोदर आहेत’ अशी भूमिका विजय प्र. दिवाण यांनी मांडली आहे.
विजय दिवाण यांनी दैनिक लोकसत्ताच्या ‘काँग्रेसची घुसखोरी’ या बातमीस उत्तर देताना लिहिलेल्या लेखात सर्वोदय व काँग्रेस यांच्यातील ऐतिहासिक, वैचारिक व विधायक संबंधांची सविस्तर चर्चा केली आहे.महात्मा गांधींच्या निधनानंतर मार्च १९४८ मध्ये सेवाग्राम येथे झालेल्या संमेलनात विनोबा भावे व पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सर्वोदय समाज’ व ‘सर्व सेवा संघ’ या चळवळींची पायाभरणी झाली. तेव्हाचे काँग्रेसचे नेते – पंतप्रधान नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, आचार्य कृपलानी आदींची उपस्थिती हे दर्शवते की सर्वोदय व काँग्रेस यांचे नाते हे संघर्षात्मक नव्हे तर सहकार्यात्मक होते.
विनोबा भावे यांच्या भूदान-ग्रामदान चळवळीला काँग्रेस सरकारने कायदेशीर बळ दिले; ‘खादी ग्रामोद्योग आयोगा’च्या माध्यमातून सर्वोदयाच्या कार्यास आर्थिक पाठबळ दिले. विनोबा-इंदिरा भेटीतही परस्पर विश्वासाचे नाते स्पष्ट होते, असे दिवाण सांगतात.विजय दिवाण यांच्या मते, १९७३ नंतर राजकीय परिस्थिती बदलली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सर्वोदयाची भूमिका द्विधा ठरली. काहींनी काँग्रेसला विरोध केला, तर काहींनी गांधीवादी परंपरेत काँग्रेसशी मैत्री कायम ठेवली. या संधीचा फायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपने घेतला आणि विनोबा-नेहरू यांना बदनाम करून आपले वैचारिक वर्चस्व वाढवले.
आज पुन्हा सर्वोदय व काँग्रेसमध्ये जुळवापण सुरू आहे. सेवाग्राममध्ये काँग्रेसच्या ‘राजीव गांधी पंचायतराज संघटने’ला प्रशिक्षणासाठी जागा दिली जाते. ‘सर्वोदय संकल्प पदयात्रा’ही संयुक्तरित्या झाली. हर्षवर्धन सपकाळ, मीनाक्षी नटराजन, सचिन राव यांसारख्या काँग्रेस नेत्यांनी सर्वोदयाशी वैचारिक संवाद सुरू केला आहे.विजय दिवाण म्हणतात की, “वर्णव्यवस्था नव्या स्वरूपात पुन्हा येतेय. शिक्षण, पाणी, जमीन, नैसर्गिक संसाधनांवर गरीबांचे हक्क हिरावले जात आहेत.” अशा वेळी, गांधी-नेहरू-विनोबा यांचा समतावादी, अहिंसक विचार नव्याने उभा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.