नागपूर: नागपूर जिल्ह्यात मागील २ ते ३ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी (८ जुलै) रात्रीही दमदार पाऊस पडल्याने रात्री २.३० वाजता नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश काढले. आदेशात काय? आपण जाणून घेऊ या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात आहे की, ज्याअर्थी, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार नागपुर जिल्ह्यात दिनांक ०८ जुलै २०२५ रोजी ऑरेंज अलर्ट आणि दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. नागपुर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. नागपुर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला असून भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार जर अतिमुसळधार पाऊस पडल्यास दिनांक ०९ जुलै, २०२५ रोजी नागपुर जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपुर जिल्हयातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावीत झाले असून नागपुर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना उद्या दिनांक ०९ जुलै २०२५ रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे.
दरम्यान ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क्र. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत.
त्याअर्थी मी, डॉ. विपिन इटणकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपुर मला आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व संदर्भ क्र. २ शासन परिपत्रक नुसार प्राप्त अधिकारान्वये नागपुर जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालये व कोचिंग क्लासेस यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण नागपुर जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये (नागपुर महानगरपालिका क्षेत्रा सह) दिनांक ०९ जुलै, २०२५, बुधवार रोजी सुट्टी जाहीर करीत आहे. शाळांना सुट्टीचे आदेश अद्याप बऱ्याच पालकांपर्यंत पोहचले नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याबाबत गोंधळाची स्थिती अशे.