सामन्यांना न्याय मिळवून देणाऱ्या वकील महिलेचा विनयभंग झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. नागपूरमधील एका कनिष्ठ वकील महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टिस करणाऱ्या एका ५५ वर्षीय वरिष्ठ वकिलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने म्हटलं आहे की आरोपीने तिचा अनेकदा पाठलाग केला आहे, कार्यालयातील कक्षात बसलेले असताना आरोपी सतत एकटक माझ्याकडे बघत असतो, तसेच त्याने अनेकदा मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे मला आमच्याच कार्यालयात असुरक्षित वाटू लागलं आहे.

पीडित वकील महिलेने सांगितलं, अनेकदा मी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला. तरीसुद्धा त्याने पाठलाग करणं थांबवलं नाही आणि तो या-ना त्या प्रकारे मला त्रास देतच राहिला. कार्यालयातल्या माझ्या क्युबिकलवर (कक्ष, डेस्क किंवा ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची बसण्याची जागा) जाऊन मी बसते आणि तिथून उठून बाहेर जाते, तेव्हा प्रत्येक वेळी तो माझ्याकडे पाहत असतो. त्यामुळे मला असुरक्षित वाटायचं. बऱ्याचदा मी आणि माझ्या इतर वरिष्ठांनी माझी बसण्याची जागा बदलली. काही वेळा मी टेबलावर माझी आणि इतरांची बॅग ठेवली, जेणेकरून मी त्याला दिसणार नाही. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. कारण त्यानंतर तोसुद्धा जागा बदलून माझ्याकडे एकटक पाहायचा.

वरिष्ठाकडून होणारा हा त्रास सहन न झाल्याने अखेर या महिलेने महाराष्ट्र आणि गोवा बार कॉऊन्सिलकडे, हायकोर्ट बार असोसिएसशन आणि उच्च न्यायालय प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीत पीडितेने म्हटलं आहे की या छळामुळे सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था असलेल्या आपल्या न्यायालयातच मला सुरक्षित वाटत नाही. मी आमच्या कार्यालयातील माझ्याच कक्षात प्रवेश करू शकत नाही, कारण, आरोपी मला तिथे त्रास देतो, माझ्याकडे एकटक पाहतो, वेगवेगळ्या कारणांनी माझ्याजवळ येण्याचा, माझ्याशी बोलण्याचा, चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला तिथे असुक्षित वाटतं. या सगळ्याचा माझ्या कामावर परिणाम होतोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित फिर्यादी महिलेने आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. आपला मानसिक छळ होत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. फिर्यादी महिला म्हणाली, जेव्हा एखाद्या खटल्याप्रकरणी काम करताना, किंवा न्यायालयात बाजू मांडताना सायंकाळी ४.३० नंतर मला थांबावं लागतं, तेव्हा मी माझं साहित्य, माझी बॅक दुसऱ्या वकिलांच्या कक्षात नेऊन ठेवते. जेणेकरून मला माझ्या कक्षात जावं लागणार नाही आणि तो (आरोपी) मला पाहणार नाही, त्रास देणार नाही. कारण दुपारी ३, ४ नंतर उच्च न्यायालयाच्या बार रूममध्ये मोजकेच वकील असतात. आरोपी मात्र अशा वेळी उशिरापर्यंत थांबतो.