नागपूर: नागपुरातील बाजारगाव परिसरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर काही रुग्णांवर दुचाकीवर रुग्णवाहिकेत जाण्याची पाळी आली. नेमके काय झाले? याबाबत आपण जाणून घेऊ या.

स्फोटानंतर कंपनीच्या अमरावती मार्गावरील दुसऱ्या द्वारातून एक कामगार गंभीर रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर आला. त्याला उपस्थितांनी तातडीने कंपनीच्या मुख्य द्वारावर दुचाकीवर आणून रुग्णवाहिकेची मागणी केली. परंतु, १५ ते २० मिनिटे रुग्णवाहिका मिळत नसल्याचे बघत शेवटी काहींनी दुचाकीवर त्याला कोंढाळी येथील रुग्णालयात हलवले. स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना काढणे सुरू केले. यावेळी पोलिसांनी रुग्णवाहिका घटनास्थळापर्यंत आणण्याचे प्रयत्न केले.

परंतु कंपनीच्या काही अधिकाऱ्यांकडून आडकाठी आणली जात होती. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना मुख्य द्वारापर्यंत पायी येऊन रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले जात होते. परंतु, काही अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर शेवटी घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचल्या. दरम्यान स्फोटाने कंपनीतील घटना घडल्या इमारती शेजारील उपाहारगृहातील छत अनेक फूट हवेत उडाले. छतातील लोखंडी पत्रे तेथे झोपलेल्या दोन कामगारांच्या पायावर पडल्याने दोघांचे पाय शरीरापासून वेगळे झाले. दोघांनाही तातडीने नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कैलास वर्मा आणि मनीष वर्मा असे दोघा जखमींची नावे आहेत.

सरकारचा दुटप्पीपणा, अधिकारी काजू-बदाम खाण्यात व्यस्त – बच्चू कडू

सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत वारंवार स्फोट होत आहेत. येथे पेसोद्वारे वेळोवेळी पोलीस, पर्यावरण विभागासह संबंधित विभागातील अधिकारी व कंपनी प्रतिनिधींसोबत बैठक होते. यावेळी येथील सुरक्षेची तपासणी गरजेची आहे. मात्र, अधिकारी येथे काजू, बदाम खाण्यात व्यस्त असून काहीही करताना दिसत नाही. या कंपनीचा मालक भाजपशी संबंधित आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल न करता इंजिनियरला पुढे करून मालकचा बचाव केला जात आहे. दंगलीत हिंदू व्यक्ती दगावल्यास बाऊ केला जातो. आता कंपनीत हिंदू कामगार ठार झाल्यानंतर मात्र एकही शब्द निघत नाही. त्यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसतो. गरिबांचे सरकारला काही देणेघेणे नाही, असा आरोप प्रहार पक्षाचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी घटनास्थळी केला.

दीड किलोमीटरवरील हाॅटेलच्या काचा फुटल्या

स्फोट झालेल्या कंपनीहून दीड किलोमीटर अंतरावर अमरावती रोडवर एक खासगी हाॅटेल आहे. स्फोटामुळे या हाॅटेलच्या काचा फुटल्या. यावेळी हाॅटेलमधील एका खोलीत कंपनीतील अधिकारी आराम करत होते. तर हाॅटेलमध्ये व्यवस्थापक दिलीप रहांगडले व एक कर्मचारी स्वागत कक्षात आराम करत होते. स्फोटामुळे या व्यवस्थापकाचा सोफा काही इंच वर उसळला. त्यामुळे तेथील सगळे तातडीने हाॅटेलच्या बाहेर आले. यावेळी कंपनीत काहीतरी झाल्याचे कळल्यावर ते तेथे गेले. रहांगडले नेहमी रात्री साडेबाराच्या दरम्यान हाॅटेलच्या बाहेर फिरत असतात. परंतु, बरे वाटत नसल्याने ते साडेअकरा वाजता झोपले. त्यामुळे थोडक्यात बचावल्याचे ते म्हणाले.

घटनेची सखोल चौकशी – पालकमंत्री

बाजारगाव येथील स्फोटाची घटना दुर्दैवी आहे. दगावलेल्या मयूर गणवीर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. प्रशासनाच्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात असून मी सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहे. या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने योग्य उपचार सुरू करण्यात आले आहे, अशी पोस्ट समाज माध्यमावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.