नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघिणींच्या अशा अनेक कथा आहेत, त्यांच्या मातृत्वाचे अनेक किस्से आहेत. अशा अनेक “सुपरमॉम्स” ताडोबात होऊन गेल्या आहेत. ताडोबाचे जंगल समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. यातीलच एक वाघीण म्हणजे “पाटलीन बाई” उर्फ “कोन पाटील”. म्हणजेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पतील शिरखेडा परिसराची राणी. जी “क्वीन ऑफ शिरखेडा” म्हणूनही ओळखली जाते.तिच्या मातृत्वाचा एक क्षण वन्यजीव अभ्यासक व छायाचित्रकार मकरंद परदेशी यांनी टिपला होता. मातृत्वदिनाच्या निमित्ताने त्यांनी तो “लोकसत्ता”ला उपलब्ध करून दिला.
वाघिणीच्या मातृत्वाची तुलना करताच येत नाही. वाघिणीतल्या आईला कळणारी एकच गोष्ट असते आणि ती म्हणजे तिच्या बछड्यांची सुरक्षा. ती गर्भवती असतानापासून तर बछड्याला जन्म दिल्यानंतर तो दोन वर्षांचा होईस्तोवर त्याची काळजी घेणे. तो बछडा दुधावर होईस्तोवर त्याला दूध पाजणे आणि मग त्याला त्याचे अन्न कसे मिळवायचे हे शिकवून त्याला आत्मनिर्भर करणे, हेही वाघीणच करते.
मिलनानंतर वाघाला वाघिणीशी काहीही देणेघेणे उरत नाही, पण गर्भवती असण्यापासून तर बछडा जन्माला येईस्तोवर सगळी जबाबदारी वाघीणच पार पाडते. कित्येकदा यातूनच तिच्यात एकप्रकारचा अतिसुरक्षितपणा येतो. बछड्यांच्या काळजीतून ती माणसांवर हल्ले करते. वाघिणीतल्या आईला कळणारी एकच गोष्ट असते ती म्हणजे तिच्या बछड्यांसाठी सुरक्षित जागा आणि काही अन्न शोधणे. खरेतर वाघांना माणसांची प्रचंड भीती वाटते. माणसांपासून दूर राहणारी ही प्रजाती. मात्र, जंगलातील माणसांचा वाढलेला वावर आणि पर्यटनाचा अतिरेक यामुळे वाघ माणसळलेला. तरीही वाघाला त्याची सुरक्षा धोक्यात आली आहे असे वाटत असेल तर तो माणसांवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहात नाही.
ताडोबातील वाघिणीचा असाही "मातृत्वदिन"https://t.co/2jrmCKvB4K #viralvideo #socialmedia #Tiger #MothersDay
व्हिडिओ क्रेडिट – मकरंद परदेशी pic.twitter.com/KqkTuQTVyWThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) May 11, 2025
वाघांनी माणसांवर केलेले बहुसंख्य हल्ले हे अपघाताने किंवा भीतीने झालेले असतात आणि हे खुद्द महान जिम कार्बेट यांनी स्वतःच जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे आणि हेच अजूनही सत्य आहे. यातूनच काहीही दोष नसताना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील “अवनी” या वाघिणीचा बळी गेला. तर कित्येक वाघिणीचे बछडे त्यांच्यापासून दुरावले गेले.