नागपूर : शहराचे तापमान ४० डिग्री पेक्षा जास्तवर पोहोचले आहे. अशात वाहतूक पोलीस विभागाने नागरिक आणि वाहन चालकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नागरिकांना सिग्नलवर उभे राहण्यापासून दिलासा देण्यासाठी ज्या चौकांत दुपारच्या सुमारास वाहतुकीचा प्रवाह फारच कमी असतो त्या चौकातील सिग्नल दुपारी १ ते ४ पर्यंत ‘ब्लिंकर मोड’वर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील ३३ चौकांची निवड करण्यात आली आहे.

या चौकात वाहन चालकांना जबाबदारीने वाहन चालविण्याचे आवाहन केले आहे.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले की, शहरातील सर्व मुख्य चौकांत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सिग्नल लावण्यात आले आहेत. मात्र, शहराचे तापमान वाढत आहे. अशात सर्व चौकांत वाहन चालकांना सिग्नल हिरवा होतपर्यंत थांबावे लागते. दुपारच्या वेळी वाहनांचा प्रवाह तसाही कमी असतो. त्यामुळे भीषण उष्णतेत लोकांना सिग्नलवर थांबवे लागत असल्याने त्रास होतो. ही बाब लक्षात घेता वाहतूक विभागाने सर्व चौकांचा आढावा घेऊन ३३ अशा सिग्नलची निवड केली जेथे दुपारी सिग्नल ”ब्लिंकर मोड’वर ठेवले जाऊ शकतात.

या चौकांमध्ये लेडिज क्लब चौक, जीपीओ, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, पोलिस तलाव टी-पॉइंट, व्हीसीए, मोहम्मद रफी चौक, कन्नमवार चौक, हिस्लॉप कॉलेज चौक, राजा-राणी चौक, धरमेठ वाय पॉइंट, अजित बेकरी चौक, हिंदुस्तान कॉलनी, अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, टेलिफोन एक्स्चेंज चौक, आंबेडकर चौक, कमाल चौक, डीपी रोड टी-पॉइंट, टीबी वॉर्ड चौक, पुरूषोत्तम बाजार चौक, नीरी टी-पॉइंट, माता कचेरी चौक, जयताळा बाजार चौक, खामला चौक, भेंडे लेआऊट, देवनगर, आवारी चौक, गुरूदेवनगर चौक, सक्करदरा चौक, संघर्षनगर चौक, कडबी चौक, १० नंबर पूल चौक आणि इंदोरा चौकाचा समावेश आहे. या सर्व चौकांत सिग्नल दुपारी १ ते ४ वाजतापर्यंत ब्लिंकर मोडवर राहतील. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नलवर थांबावे लागणार नाही. मात्र वाहन चालकांना या दरम्यान जबाबदारीने आणि सावध राहून वाहन चालवावे लागेल. वाहनांची गती २० हून अधिक नसली पाहिजे. चौक ओलांडण्यापूर्वी तिन्ही बाजूने येणारी वाहने पाहून स्वत:च्या आणि दुसऱ्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल.