scorecardresearch

नागपूर : चक्क एकाच खोलीत होते संपूर्ण महाविद्यालय; परीक्षा संचालकांनी अचानक भेट दिल्याने प्रकार उघड

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित खामला परिसरातील राधे महाविद्यालयाचा प्रकार

Nagpur radhe exam center
(प्रातिनिधिक छायाचित्र)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित खामला परिसरातील राधे महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला परीक्षा संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता येथील गैरप्रकार उघडकीस आला. येथे चक्क एका खोलीमध्ये हे महाविद्यालय सुरू होते. पहिल्या माळ्यावर एका कुटुंबाचे वास्तव्य तर प्राचार्य कक्ष व वर्गखोल्यांचा कुठेही पत्ता नाही. त्यामुळे महाविद्यालयाची परीक्षा कुठे होते, असा प्रश्न केला असता खुद्द प्राचार्यांना परीक्षाच सुरू असल्याची माहिती नव्हती. त्यामुळे येथील परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून कारवाई केली जाणार आहे.

नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या काही महाविद्यालयांमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार सुरू असल्याचे अनेकदा समोर आले. त्यामुळे परीक्षा संचालक व त्यांच्या चमूने धडक मोहीम सुरू केली आहे. डॉ. साबळे राधे महाविद्यालयाला भेट देण्यासाठी गेले असता अर्धा तास संपूर्ण परिसर फिरूनही महाविद्यालयाचा पत्ताच सापडत नव्हता. शेवटी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रमुखांना संपर्क केला. त्यावर त्यांनी ज्युपीटर शाळेनजिकचा पत्ता दिला. येथे गेले असता केवळ एका खोलीमध्ये छायांकित प्रत काढणारी मशिन दिसून आली. वरच्या माळ्यावर एक कुटुंब वास्तव्याला होते. वर्गखोल्या आणि परीक्षा केंद्राची माहिती विचारली असता दुसरीकडे खोल्या आहेत असे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या परिसरातही कुठेही महाविद्यालयाचे नाव किंवा व्यवस्था आढळून आली नाही.

राधे महाविद्यालयाला दोन वर्षांआधी मान्यता मिळाली असून येथे २२ जूनपासून उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. मात्र, महाविद्यालयात व्यवस्थाच नाही तर परीक्षा होतात कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. साबळे यांनी प्राचार्यांना जाब विचारला असता त्यांनी परीक्षा सुरू असल्याची कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता राधे महाविद्यालयातील परीक्षा यापुढे संताजी महाविद्यालयात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याआधी झालेल्या सर्व पेपरच्या मूल्यांकनाची जबाबदारी संताजी महाविद्यालयाकडे देण्यात आली आहे.

परीक्षेत गैरप्रकार –

राधे महाविद्यालयाच्या केंद्रावर झालेल्या पेपरची तपासणी केली असता त्यांचे अद्यापही मूल्यांकन झालेले नाही. तसेच उत्तरपत्रिकाही संशयित स्वरूपाच्या आढळून आल्या.

राधे महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरीलल प्रकार गंभीर आहे. याची चौकशी होणार आहे. अशी प्रतिक्रिया परीक्षा व मूल्यांकन संचालक, डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur the entire college in one room exam center canceled msr

ताज्या बातम्या