नागपूर : घरातील गरिबीची परिस्थिती आणि चुकीच्या मैत्रिणींची संगत लागल्यामुळे दहावीत शिकणारी मुलगी एका ‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकली. मनिषनगरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यात आंबटशौकीन ग्राहकासोबत ती सापडली. पोलिसांनी तिला पकडून सुधारगृहात टाकले. मात्र, ती दहावीची विद्यार्थिनी असल्यामुळे पोलिसांनी तिली विशेष पोलीस वाहन आणि महिला पोलिसांच्या मदतीने नागपूर ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रावर जाण्याची व्यवस्था केली.

मुलीने पेपर सोडविला आणि पोलिसांनी तिला पुन्हा महिला सुधारगृहात पोहचवले. पीडित मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नागपूर पोलिसांनी सकारात्मक पाऊल उचलले. बेलतरोडी पोलिसांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी प्रतीक्षा (बदललेले नाव) नागपूर ग्रामीण भागातील रहिवाशी असून तिचे आईवडिल शेतमजूर असून तिच्यासह लहान बहिण शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च आईवडिलांना झेपत नव्हता. आईवडिलांना थोडीफार आर्थिक मदत होईल म्हणून प्रतीक्षा काम शोधत होती.

दरम्यान, तिची मैत्रीण प्रितीने तिला झटपट पैसा कमविण्यासाठी नागपुरातील हॉटेलमध्ये स्वागत कक्षातील काम सूचवले. प्रतीक्षा आणि प्रिती दोघेही मनिषनरातील कृष्णकुंज हॉटेलमध्ये कामाला लागल्या. यादरम्यान, हॉटेलमध्ये येणाऱ्या आंबटशौकीन ग्राहकांकडे जाऊन प्रिती बक्कळ पैसे कमावत होती.

तिने नववीत असलेल्या प्रतीक्षालाही ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास प्रोत्साहित केले. झटपट पैसे कमविण्याचा मार्ग दाखविणाऱ्या मैत्रिणीच्या नादाला लागून प्रतीक्षा ‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकली. गेल्या १३ फेब्रुवारी २०२४ मध्ये मनिषनगरातील हॉटेल कृष्णकुंज येथे बेलतरोडी पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात प्रतीक्षाला ग्राहकासह पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची पाटणकर चौकातील महिला सुधारगृहात रवानगी केली. या वर्षी प्रतीक्षा ही दहावीत असून गेल्या वर्षभरापासून ती सुधारगृहात अभ्यास करीत होती.

दहावीची परीक्षा अन् पोलिसांचे सहकार्य

दहावीच्या परिक्षेचे वेळापत्रक आले आणि बेलतरोडी पोलिसांना प्रतीक्षाच्या शैक्षणिक नुकसानीची जाणिव झाली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी मोटर वाहन विभागाला पत्र लिहून पोलीस वाहनाची व्यवस्था केली. महिला पोलिसांना आदेश देऊन प्रतीक्षाला परीक्षा केंद्रावर सोडले. प्रतीक्षाचे पेपर सुरु असून महिला पोलिसांचे पथक तिला सहकार्य करीत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मैत्रिणीच्या नादाला लागून पीडित विद्यार्थिनी सेक्स रॅकेटमध्ये अडकली. मात्र, त्या मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची आम्हाला जाणिव आहे. त्यामुळे त्या मुलीला परीक्षा केंद्रावर पोहचविण्यासाठी पोलिसांनी व्यवस्था केली आहे. – मुकुंद कवाडे (ठाणेदार, बेलतरोडी पोलीस स्टेशन, नागपूर)