नागपूर : पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा आणि पहिला पाऊस पडून गेल्यानंतर पसरलेल्या हिरवळीवर मस्ती करण्याचा मोह कुणालाही आवरणार नाही. तरुणाई तर अशा संधीची वाटच पाहत असते. जंगलातील प्राण्यांच्या बाबतीतही हेच घडते. उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यातील “एफ-२” वाघिणीचे बछडे आता वयात येऊ लागले आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या बछड्यांना देखील या पावसाळी वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांच्या या मस्तीचा व्हिडिओ वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजीत मडावी यांनी चित्रित केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरत आहे ती “एफ-२” वाघीण आणि तिचे पाच बछडे. याच वाघीण आणि तिच्या बछड्यानी अभयारण्यातील गाईड आणि जिप्सी ड्रायव्हर यांना अडचणीत आणले होते. त्यामुळे अजूनच त्यांना बघण्याची चुरस पर्यटकांमध्ये वाढीला लागली आहे. यातून “सेलिब्रिटी” तर सुटले नाहीतच, पण सरकारी अधिकाऱ्यांना देखील हा कुटुंबकबिला पाहण्याचा मोह आवरत नाही आहे.अलीकडेच या अभयारण्यात “एफ-२” वाघीण आणि तिच्या बचड्यांचा रंगलेला मातृत्वाचा सोहोळा पर्यटकांना पाहायला मिळाला.

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘जय’ या वाघाने. नागझिरा अभयारण्यातून नैसर्गिक स्थलांतर करुन आलेला हा वाघ नंतर कधी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा झाला ते कळलेच नाही. कधी राष्ट्रीय महामार्गावर, कधी नद्या ओलांडणाऱ्या ‘जय’ ला पाहण्यासाठी सामान्य पर्यटकांपासून तर ‘सेलिब्रिटी’ अशी सर्वांचीच गर्दी असायची. मात्र, ‘जय’ गेला आणि पर्यटकांनी या अभयारण्याकडे पाठ फिरवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चांदी” या वाघिणीने पर्यटकांना आकर्षित केले, पण खरे आकर्षित केले ते ‘फेअरी’ या वाघिणीने. ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांनी हे अभयारण्य गजबजले आणि पाठ फिरवलेल्या पर्यटकांनी पुन्हा या अभयारण्याकडे मोर्चा वळवला. आता फेअरी या वाघिणीचेच बछडे असलेल्या “एफ-२” या वाघिणीने देखील पाच बचड्यांना जन्म दिला. “फेअरी” पेक्षाही तिचे अपत्य असलेल्या “एफ-२” वाघीण आणि तिच्या बछड्यांनी या अभयारण्याला पुन्हा एकदा नावलौकिक मिळवून दिला आहे. पावसाळ्यात पाण्यात डुंबण्यापासून तर आता पाऊस पडून गेल्यानंतर मस्ती करण्यापर्यंतच्या त्यांच्या अनेक गोष्टी पर्यटकांना आकर्षित करत आहेत.