नागपूर : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा अनुषंगाने राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही त्रिभाषा धोरण निश्चित समिती १० आक्टोबर रोजी नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांशी संवाद साधणार जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहे. राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग झाल्यानंतर निर्णयातून सरकारने माघार घेतली. यानंतर राज्य सरकारने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली.

आठ जणांच्या समितीत डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, डॉ. वामन केंद्रे , संचालक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा , डॉ. अपर्णा मॉरिस शिक्षणतज्ज्ञ, सोनाली कुलकर्णी जोशी भाषा विज्ञान प्रमुख, डेक्कन कॉलेज पुणे, डॉ. मधुश्री सावजी, शिक्षणतज्ज्ञ छत्रपती संभाजीनगर, डॉ. भूषण शुक्ल, बालमानसतज्ज्ञ पुणे, तर सदस्य सचिव संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान, यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून, कशाप्रकारे लागू करावयाचे याबाबतचे धोरण निश्चित करण्याकरिता विभागनिहाय भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे. समिती १० ऑक्टोबर रोजी नागपूर विभागातील राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांची मते जाणून घेणार आहे. राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, शिक्षण तज्ज्ञ, विविध संस्थांचे प्रतिनिधी, पालक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत व आंदोलक यांना राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्रबाबत मते, व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांकरिता आपली मते, tribhashasamiti.mahait.org संकेतस्थळावर सुध्दा नोंदवता येतील.