नागपूर : गोमांस विक्री आणि वाहतूकीवर बंदी असतानाही कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या मुक्या गोधनाच्या बाबतीत रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली. अपघाताच्या दुर्दैवी घटनेनंतर ट्रकचा भडका उडून होरपळून दगावलेल्या २९ मुक्या प्राण्यांच्या हांबरड्याच्या आक्रोशाने कळमेश्वर तालुका हादरून गेला. ट्रकमध्ये कोंबलेल्या अवस्थेत तस्करीसाठी वाहून नेणाऱ्या ट्रकला हा भीषण अपघात घडला. काही सेकंदात ट्रकने पेट घेतल्याने २९ मुक्या प्राण्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
कळमेश्वर तालुक्यातल्या फेट्री ते गोरेवाडा दरम्यान फेट्री शिवार परिसरात रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत ही ३६ जनावरे नागपूर पासून जवळच भंडारा मार्गावरच्या महालगाव परिसरातून कळमेश्वरकडे वाहून नेली जात होती. दरम्यान फेट्री शिवारात ट्रकला भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रक इंधनाच्या टाकीच्या दिशेने कलंडला. अपघातग्रस्त ट्रक रस्त्यावर दूरपर्यंत फरफट गेल्याने आगीच्या ठिणग्यांनी ट्रकने काही क्षणांत पेट घेतला.
आगीचा भडका उडाल्याने ट्रकमध्ये कोंबून भरलेले मुके गोधन एमकेकांच्या अंगावर कोसळले. ट्रकमध्ये दोरीने त्यांना बांधून ठेवलेले असल्याने एकाही मुक्या प्राण्याला साधे उठता देखील आले नाही. तोच काही क्षणात आगीचा भडका उडून ट्रकमधल्या २९ मुक्या जनावरांचा अक्षरशः कोळसा झाला. या प्रकरणात ग्रामीण पोलीसांनी तत्काळ ट्रकचा चालक नासीर याला अमरावती येथून अटक केली आहे. सोबतच ट्रकचा चालक आणि त्याच्या वाहकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून ही जनावरे कशासाठी दाटीवाटीने कोंबून नेली जात होती, याची आता चौकशी केली जात आहे.
अवैध कत्तलखाने पुन्हा चर्चेत
गोमांस विक्री आणि वाहतूकीवर कायद्याने बंदी आणल्याने शहर आणि आसपासचच्या कत्तलखान्यांनी आपले बस्तान ग्रामीण भागातल्या निर्जनस्थळी वसवले आहे. त्यामुळे ग्रामीण हद्दीतून होणाऱ्या गोधनाची तस्करी वारंवार समोर येत आहे. त्यातच कत्तलीसाठी वाहून नेल्या जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात होऊन दगावलेल्या जनावरांमुळे ग्रामीण भागातील कत्तलखाने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
