नागपूर : नागपूर शहर हादरवणारी घटना आज शुक्रवारी (१२ सप्टेंबर) सकाळी घडली आहे. कोराडी रोडवर मॅक्स हॉस्पिटलजवळ दोन स्कूल बसची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल ८ शाळकरी मुले जखमी झाली असून त्यापैकी एक विद्यार्थ्यांनी व चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलांच्या किंकाळ्यांनी परिसर दणाणून गेला. या घटनेनंतर संतप्त जमावाने काय केले? याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपुरातील कोराडी रोडवर मॅक्स हॉस्पिटलजवळ घडलेल्या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. नागरिकांनी रस्त्याच्या कामातील बेफिकिरीबद्दल संताप व्यक्त करत काम करणाऱ्या खासगी कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘ओरिएन्ट कंपनी’ मुर्दाबाद’च्या घोषणा देत संतप्त जमाव रस्त्यावर बसला. नागरिकांनी आंदोलन छेडल्याने येथे तणाव निर्माण झाला होता. घटनेमुळे येथे बघ्यांचीही लोठी गर्दी जमल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र भीती व संतापाचे वातावरण पसरले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कोराडी रोडवरील सुरू असलेल्या अपुऱ्या आणि हलगर्जी कामामुळेच हा अपघात झाला. येथील कामात दिरंगाई आणि वाहतुकीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे या भागात अपघात वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर सतत अपघात होत असून प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमाव पांगवण्यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला. मात्र, संतापलेल्या नागरिकांनी ‘आता पुरे झाले, आमच्या लेकरांचा जीव धोक्यात घालनाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अपघातामुळे विद्यार्थ्यांना जखमी अवस्थेत जवळच्या दाखल दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. काही पालकांना मुलांना पाहून आक्रोश फुटला.

वारंवार होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण ?

कोरडी रोडवर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते दुरुस्तीच्या कामातील बेपर्वाईमुळे वारंवार अपघात होत आहे. त्यात अनेक जखमी होत असून काहींचा जीव घेतले जात असतानाही एनएचआय आणि स्थानिक प्रशासन फक्त तमाशा बघत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे आजच्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा प्रशासन व कंत्राटदार कंपन्यांच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह उभा केले आहे. नागरिक आता जबाबदारांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही’ या भूमिकेत आहेत. आता या प्रकरणात प्रशासन आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.