नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ विधिसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. ३० नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून २ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेवर दहा नोंदणीकृत उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. पदवी मिळाल्यापासून पाच वर्षे झालेल्या सर्व नोंदणीकृत पदवीधरांची तात्पुरती मतदार यादी विद्यापीठाने जाहीर केली आहे. या पदवीधरांना ‘बी फॉर्म’ भरण्याची गरज नसल्याचेही कळवण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवारांना आपले नाव निर्वाचक गणात समाविष्ट करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ‘फॉर्म-बी’ भरावयाचा आहे. २५ ऑक्टोबरपासून सुरू होणारी ही प्रक्रिया २ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. अर्ज भरणे, आक्षेप, पडताळणी, मतदारयाद्या तसेच उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करणे, प्रत्यक्ष निवडणूक, मतमोजणी आणि निकाल अशा सर्व बाबींचे वेळापत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे.
अधिसभेच्या या निवडणुकीसाठी सहा प्रवर्ग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये, खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती प्रवर्ग, अनुसूचित जमाती प्रवर्ग, भटक्या जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्ग प्रवर्ग, महिला प्रवर्ग असे एकूण १० उमेदवार निवडले जाणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे निवडणूक निर्णय अधिकारी तर उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत आहेत.
विद्यापीठाला विधिसभा निवडणुकांमध्ये पदवीधरातील दहा जागांचा समावेश असतो. त्यासाठी जून महिन्यामध्ये नव्या मतदारांच्या नोंदणीस सुरुवात करण्यात आली. यामध्ये ४५ हजारांवर नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे. मात्र, या मतदारांशिवाय २००५ पासून असलेल्या मतदारांना ‘बी’फॉर्म भरणे गरजेचे आहे. यासाठी २० ऑक्टोबरला विद्यापीठाने परिपत्रक काढले. या परिपत्रकामध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत सर्व मतदारांचे ‘बी’ फॉर्म भरावयाचे आहेत. मात्र, २००५, २०१० आणि २०१७ या तिन्ही वर्षातील मतदार नोंदणी ही किमान ७० हजाराच्या घरात आहे. त्यामुळे इतक्या कमी वेळात नोंदणी करायची असा प्रश्न संघटनांद्वारे उपस्थित केला जात आहे.
असा आहे कार्यक्रम
- निर्वाचक गणात नाव समाविष्ट करणे : २५ ऑक्टोबर
- निर्वाचक गणाची तात्पुरती मतदार यादी : २७ ऑक्टोबर
- अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ५ नोव्हेंबर
- नामनिर्देशनपत्र कुलसचिवांकडे सादर करणे : १० नोव्हेंबर
- उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे : १७ नोव्हेंबर
- निवडणुकीचा दिनांक : ३० नोव्हेंबर
- मतमोजणी आणि निकाल : २ डिसेंबर