भाजपच्या किल्ल्याला २९ वर्षांनी तडा
गेल्या २९ वर्षांपासून भाजपने पराभव बघितला नाही, अशा पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सामान्य कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या विकास ठाकरे यांनी विजय संपादन करून काँग्रेसचा झेंडा पुनश्च रोवला. त्यांच्या विजयामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे.
सन १९९० पासून पश्चिम नागपूर मतदारसंघ हा भाजपच गढ आहे. येथून भाजपकडून कुणीही उभा केला तरी विजयी होईल, असे मानले जात होते. १९९० मध्ये विनोद गुडधे पाटील पहिल्यांदा भाजपकडून निवडून आले. ते १९९९ पर्यंत आमदार होते. १९९९ मध्ये देवेंद्र फडणवीस येथून निवडणूक लढली. २००९ पर्यंत त्यांनी पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००९ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी फडणवीस हे दक्षिण-पश्चिम मतदारसंघात गेले.
२००९ मध्ये पश्चिममधून भाजपने सुधाकर देशमुख यांना संधी दिली. त्यांनी प्रथम अनिस अहमद यांचा पराभव केला. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी २६ हजार ४०० च्या मताधिक्याने विकास ठाकरे यांचा पराभव केला होता. पण, विकास ठाकरे यांनी मतदारसंघात अधिक परिश्रम घेतले व २०१९ च्या निवडणुकीच पराभवाचा वचपा काढला. गेल्या २९ वर्षांपासून या मतदारसंघात भाजपने कधीच पराभव बघितला नव्हता. यंदा विकास ठाकरे यांनी ८३ हजार २५२ मते घेऊन देशमुख यांच्यावर ६ हजार ३६७ मतांनी विजय मिळवला. सुधाकर देशमुख यांनी ७६ हजार ८८५ मते घेतली.
दुसऱ्या फेरीपासून ठाकरेंची आघाडी शेवटपर्यंत कायम
पहिल्या फेरीसाठी ईव्हीएम उघडल्या तेव्हा देशमुख यांना ५१२ मतांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीत ठाकरे यांनी पिछाडी भरून काढत २०० मतांची आघाडी घेतली. तिसऱ्या फेरीत आघाडी ३ हजार ३९८ झाली आणि फेरीनुसार ती वाढतच गेली.
टपाल मतदानामध्येही ठाकरे यांनी २९७ मते घेतली आहेत. मतमोजणीच्या एकूण १७ फेऱ्या होणार होत्या. लोकसभेतील मताधिक्य लक्षात घेता पंधरा व सोळाव्या फेरीमध्ये सिव्हिल लाईन्स, भरतनगर, रविनगर, रामनगर, शंकरनगर, धरमपेठ, रामदासपेठ आणि सीताबर्डी या पट्टयातील ईव्हीएम उघडल्यानंतर भाजपला अधिक मते मिळतील व पिछाडी भरून निघेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना होता. त्याप्रमाणे या भागातून भाजपने आघाडी घेतली पण ती ८ हजार ५०० मतांची पिछाडी भरू शकली नाही.
महापौर ते आमदार
विकास ठाकरे यांनी नागपूर महापालिकेचे नगरसेवक, महापौर व विरोधी पक्षनेता अशा भूमिकांवर काम केले आहे. पश्चिम नागपुरातून महापौर होऊन आमदार झालेले ते दुसरे व्यक्ती आहे. यापूर्वी महापौरपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे आमदार म्हणून निवडून आले. त्यांनीही पश्चिम नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे. ही निवडणूक विकास ठाकरे यांची कारकिर्द ठरवणारी निवडणूक होती. कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर असताना त्यांनी विधानसभेत प्रवेश मिळवला आहे.
पश्चिममध्ये नोटा तिसऱ्या क्रमांकावर
काँग्रेस, भाजपच्या उमेदवाराशिवाय बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अफजल ओमर फारुख यांनी ८ हजार ४२७ मते, अपक्ष उमेदवार बबिता अवस्थी २ हजार ५० आणि मनोज कृपाशंकर सिंग यांनी २ हजार २०१ मते घेतली. निवडणूक उभ्या असलेल्या १३ पैकी ११ उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. नोटाला ३ हजार ७१७ मते मिळाली असून नोटा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
नगरसेवकांचे नाराजीनाटय़ भोवले
सुधाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी पश्चिम नागपुरातील अनेक नगरसेवकांनी केली होती. पण, पक्षाने नगरसेवक व कार्यकर्त्यांचे मत डावलून पुन्हा देशमुखांना संधी दिल्याने अनेकजन नाराज झाले. ही नाराजी पक्ष दूर करू शकला नाही व प्रचारावेळी भाजपचे अनेक नगरसेवक प्रचारात सक्रिय नव्हते व याचा अप्रत्यक्षपणे काँग्रेसला लाभ झाला.
कार्यकर्त्यांचा विजय
विविध राज्यांचे मुख्यमंत्री व इतर सेलिब्रेटी बोलावून निवडणूक जिंकता येत नाही. माझा कार्यकर्ताच माझा सेलिब्रिटी असून त्यांनीच माझा जोरदार प्रचार केला. सत्तेत नसतानाही मी लोकांची कामे केली. लोकांसोबत असलेली नाळ कोणत्याही पदावर गेल्यावरही तुटणार नाही, याची काळजी घेतली. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचेच हे फळ असून एकप्रकारे हा कार्यकर्त्यांचाच विजय आहे. – विकास ठाकरे, विजयी उमेदवार