नागपूर : इरफान अन्सारी हा वेल्डिंगचे काम करणारा मजूर होता. तो रेल्वेने इटारसीला जायला निघाला. परंतु, ऑटोचालकाने रस्त्यावरील आक्रमक गर्दी बघून पुढे जाण्यास नकार दिला. अखेर रेल्वे चुकू नये म्हणून इरफान पायीच निघाला. मात्र, विशिष्ट गटाच्या लोकांनी त्याला घेरले व बेदम मारहाण केली, असा आरोप मृत इरफानचा भाऊ इमरान अन्सारी याने केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने इरफानला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. माझ्या भावाचा एका विशिष्ट गटाने खून केला, त्यामुळे त्यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करुन अटक करा, अशी मागणीही इमरान अन्सारीने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

सोमवारी सायंकाळी दंगल उसळली. दोन्ही गटातील युवक एकमेकांवर दगडफेक करीत होते.  यादरम्यान, इरफान अन्सारी (३८, बंदे नवाजनगर, यशोधरानगर)  इतवारी रेल्वे स्थानकाकडे ऑटोने जात होता रस्त्यावर एक विशिष्ट गट आक्रमकपणे दगडफेक करताना ऑटोचालकाला दिसला. त्याने रस्त्याच्या कडेला ऑटो थांबवून पुढे जाण्यास नकार दिला. 

इटारसीला पोहचायचे असल्यामुळे इरफान हा पायीच निघाला. यादरम्यान, काही युवकांनी इरफानला घेराव घातला. त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या हातातील कापडाची पिशवी फेकून दिली. हा प्रकार एका पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आला. त्या अधिकाऱ्याने धाव घेतली असता युवक पळाले. पोलीस अधिकाऱ्याने इरफानला बेशुद्धावस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान इरफानचा मृत्यू झाला. इरफान एकटाच कमावता होता. त्याचीही हत्या करण्यात आल्याने पत्नी उजमा आणि मुलगी जैनब फातिमा (१७) यांच्यासह कुटुंबातील सदस्य प्रसारमाध्यमांसमोर न्यायाची मागणी करुन आपली व्यथा मांडत होते.

फाशीची शिक्षा द्या

इरफानचा एका विशिष्ट गटाने खून केला. या गुन्हेगारांवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी. या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी इरफानचा भाऊ इमरान अन्सारी याने केली आहे. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. इरफानच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत करावी, अशी मागणीही यावेळी अन्सारी कुटुंबीयांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस बंदोबस्त वाढवला इरफान अन्सारीचा शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. इरफानच्या मृत्यूनंतर मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याचबरोबर सशस्त्र जवानसुद्धा या भागात तैनात करण्यात आले होते.