नागपूर : एकाच हॉटेलमध्ये नोकरी करणारे तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.प्रेयसी तीन महिन्यांची गर्भवती असताना प्रियकर विवाहित असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे प्रेयसीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विवाहित प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. आशिष अरुण माहूरकर (३३, रा. रमना मारोती, नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित २५ वर्षीय तरुणी तनुश्री (काल्पनिक नाव) ही विवाहित असून तिचे पतीशी पटत नसल्यामुळे ती माहेरी आली. त्यानंतर ती वाठोड्यात राहणाऱ्या बहिणीच्या घराशेजारी खोली करुन राहायला लागली. तिने हुडकेश्वरमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी स्विकारली. त्याच हॉटेलमध्ये आशिष माहूरकर हा स्वयंपाकी (कूक) म्हणून काम करीत होता. सप्टेबर २०२४ मध्ये दोघांची ओळख झाली. काही दिवसांतच दोघांमध्ये सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. आशिष हा प्रेयसीच्या खोलीवर जाऊन राहायला लागला.

आशिष आणि तनुश्रीच्या प्रेमप्रकरणाची चर्चा कुटुंबियांपर्यंत पोहचली. आशिषने तिला लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, आशिष विवाहित असल्याचे त्याने लपवून ठेवले. तनुश्री तीन महिन्यांची गर्भवती असल्यामुळे तिने आशिषकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, आशिष तिला टाळाटाळ करीत होता. तनुश्रीने आशिषचा पाठलाग करीत त्याच्या घरापर्यंत पोहचली. तो पत्नी व दोन मुलींसह संसार असल्याचे लक्षात आले. तिने घरात घुसून त्याला जाब विचारला. त्याने तनुश्रीला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, तनुश्रीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करुन आशिषला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणात ताबडतोब आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिष बोराडे यांनी दिली.

प्रियकराचा पाठलाग करीत घरी पोहचलेल्या तनुश्रीने विवाहित असल्याचे लपवून ठेवल्याबाबत आशिषला जाब विचारला. आशिष तिची समजूत घालत होता. त्यामुळे त्याच्या पत्नीचा पारा चढला. त्यामुळे आशिषच्या पत्नीने तनुश्रीला चांगला चोप दिला. त्यानंतर तिला घराबाहेर काढून हाकलून दिले. या प्रकारामुळे वस्तीतील नागरिक गोळा झाले. शेवटी तनुश्रीने पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.