नागपूर : जगनाडे चौकात मुख्य सिमेंट रोडवरून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची सर्वाधिक संख्या आहे. याच रस्त्यालगत असलेल्या केशवनगर शाळेचे विद्यार्थी सुसाट जड वाहनांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे पालकवर्गांतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगनाडे चौकाकडून गंगाबाई घाट चौकाकडे जाताना केशवनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे. या रस्त्याच्या अगदी दहा फुटावर या शाळेचे प्रवेशद्वार आहे. या शाळेत चार हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेतात. अशोक चौक, भांडे प्लॉट, हिवरीनगर आणि सतरंजीपुरा या चहूभागातून जगनाडे चौकाकडे वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातही खासगी बस (ट्रॅव्हल्स) आणि एसटी बसेससह अन्य जड वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. जगनाडे चौकातून सतरंजीपुरा भागाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी बघता रस्त्याच्या कडेला असलेल्या केशवनगर माध्यमिक शाळेचे विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली असतात. शाळेच्या बाहेर पडताच मुख्य रस्ता आहे विद्यार्थी रस्ता ओलांडताना घराकडे जातात. त्याना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.

हेही वाचा – जंगलातील ‘रिसॉर्ट’चा मोह वाघालाही आवरेना! ‘रिसॉर्ट’मध्येच वामकुक्षी, अन्…

दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळेबाहेर पडतात. आपापल्या स्कूलव्हॅन किंवा ऑटोकडे जातानाही विद्यार्थी अडचणीतून मार्ग काढतात. शाळा सुटल्यानंतर जगनाडे चौकापासून बऱ्याच अंतरावर वाहतुकीची मोठी कोंडी होते. शाळेच्या काही अंतरावर नागनदीवरील पूल बांधण्यात आला आहे. तो अरुंद असल्यामुळे अनेकदा जगनाडे चौक ते पुलापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. यामध्ये स्कूलव्हॅन किंवा विद्यार्थ्यांची ने-आण करणारे ऑटोरिक्षासुद्धा अडकलेले असतात. शाळेसमोरील रस्ता धोकादायक ठरत आहे.

वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी

जगनाडे चौकात नेहमी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात राहत नाहीत. तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत जर वाहतूक पोलिसांची गस्त शाळेच्या रस्त्यावर असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी पालक निश्चिंत राहतील.

शाळेसमोर गतीरोधकाची गरज

विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असतात, दरम्यान शाळेसमोरून भरधाव वाहने जात असतात. अशा स्थितीत अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावर रबरचे गतीरोधक तयार करावे. जेणेकरून वाहने शाळेसमोरुन हळू जातील.

हेही वाचा – Raj Thackeray : “प्रशासनाचा धाक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना”, राज ठाकरेंचे वक्तव्य; म्हणाले, “न्यायालयात प्रकरण…”

“जगनाडे चौकात वाहतूक पोलीस तैनात असतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.” – जयेश भांडारकर, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा)

शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांना संरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावे. – नितीन मोंढे (वाहनचालक)