नागपूर : शेतीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ७८ वर्षीय दिवानजीच्या प्रेमात ३२ वर्षीय महिला पडली. शेतातील घरात महिला दिवानजी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना अचानक पती घरी आला. त्याला दोघेही ‘नको त्या अवस्थेत’ दिसले. त्यामुळे त्याचा पारा चढला. त्याने पत्नीला मारहाण केली तर दिवानजीला शिवीगाळ करुन पळवून लावले. त्यानंतर मात्र, पत्नीने प्रियकराच्या मदतीने दारुड्या पतीचा गळा आवळून खून केला.
ही धक्कादायक घटना मंगळवारी नरखेडमध्ये उघडकीस आली. शिवा ऊर्फ शिवशंकर गणुजी धुर्वे (३४, रा.नरखेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर पत्नी रुणीता धुर्वे (३२) आणि प्रियकर शांताराम पुरणसिंह दीदावत (७८, रा. बेलोना, ता. नरखेड) अशी आरोपी प्रेमीयुगुलाची नावे आहेत. प्रेमी युगुलाला नरखेड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत
बिरोली, ता. मुलताई. जि. बैतूल-मध्यप्रदेश येथील रहिवाशी शिवशंकर हा पत्नी रुणीता व दोन मुलांसह कामाच्या शोधात नागपूरला आला होता. त्याला नरखेडमधील एका शेतकऱ्याच्या शेतीवर सालगडी म्हणून काम मिळाले. शिवा हा शेतातील घरात कुटुंबासह राहायला लागला. पती-पत्नी शेतातील काम करीत होते. तर त्यांची दोन्ही मुले नरखेड येथील शाळेत शिकत होती. सर्व काही सुरळीत सुरु होते. यादरम्यान पती शिवा याला दारुचे व्यसन जडले. तो रोज दारु पिऊन घरी यायला लागला. दारु पिण्याच्या सवयीमुळे घरात पती-पत्नीत वाद होत होते. शिवा काम करीत असलेल्या शेतमालकाकडे शांताराम दीदावत (७८) हा दिवानजी म्हणून काम बघत होता. शेतीचा लेखाजोखा आणि शेतमजुरांची मजुरी देण्याचे काम शांतारामकडे होती. त्यामुळे तो नेहमी शिवाच्या घरी येत होता. यादरम्यान, रुणीताचे शेतावरील दिवानजी शांताराम दीदावत याच्याशी सूत जुळले. दारुड्या पतीला कंटाळलेल्या रुणीताने वृद्ध दिवाजीशी अनैतिक संबंध ठेवणे सुरु केले. दिवानजीसुद्धा रोज शेतातील घरी यायला लागला.
‘नको त्या अवस्थेत’ पकडल्याने केला खून
रविवारी शिवशंकर हा दारु पिण्यासाठी गावात गेला होता. शेतावर कुणी नसल्याची संधी साधून रुणीता आणि शांताराम हे दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते. दरम्यान, तिचा पती घरी आला. दोघेही ‘नको त्या अवस्थेत’ दिसले. चिडलेल्या पतीने रुणीताला मारहाण केली. तसेच शांतारामला बघून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे सोमवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या शिवशंकर याचा रुणीता आणि प्रियकर शांताराम यांनी गळा आवळून खून केला. दुसऱ्या दिवशी अप्पर अधीक्षक अनिल म्हस्के यांना हत्याकांडाबाबत संशय आला. त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले.