नागपूर: येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. परंतु, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात दिले.

नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे एक अधिवेशन हे नागपूर येथे होत असते. विशेषतः हिवाळी अधिवेशनच नागपुरात घेण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घ्यायच्या आहेत. एकाच वेळी निवडणुका घेणे शक्य नाही. त्यामुळे तीन टप्प्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्या दृष्टिकोनातून आयोगाची तयारी सुरू आहे. या निवडणुकांसाठी अधिवेशनाची तारखेत बदल होण्याची चर्चा चंद्रशेखर बावनकुळे होती. हे अधिवेशन आठ, दहा दिवस लवकर होईल, अशीही चर्चा होती. परंतु, अद्याप प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा हालचाली नाहीत. ठरलेल्या तारखेनुसार विधिमंडळ सचिवालयाचे काम सुरू आहे. आगामी काही दिवसातच स्थानिक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्यामुळे अधिवेशन वेळेत होणार की पुढे ढकलण्यात येणार याबाबात माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता अधिवेशन ठरल्याप्रमाणे ८ डिसेंबरला सुरू न होता एक आठवडा पुढे ढकलले जाण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग दाटले आहेत. मंत्र्यांच्या अनेक बंगल्यांचे काम प्रलंबित आहे. १५० कोटींची बिले थकीत असल्याने ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे नागपूरऐवजी मुंबईत अधिवेशनाची चर्चा सुरू आहे. मात्र, नागपूर करारानुसार विधिमंडळाचे एक सत्र नागपूरमध्ये घेणे बंधनकारक आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक होईल. त्यात सरकारी यंत्रणा कामात असेल. त्यामुळे त्यानंतरच हिवाळी अधिवेशन घेणे शक्य होईल. याबाबत विचार सुरू आहे. मात्र, निर्णय झालेला नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले