नागपूर : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. या दिवशी बहिणी भावाच्या हाताला रेशीमधागा बांधतात. त्या बदल्यात भाऊ आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन बहिणींना देतो. हा सण अगदी तोंडावर आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या शहरातच लाडक्या बहिणी असुरक्षित असल्याचे वास्तव सांगणाऱ्या घटना दररोज शहरात घडत आहेत. नातेसंबंधांमधील व्यक्तींकडूनच काय तर शहरातल्या वर्दळीच्या ठिकाणी फिरताना देखील मुलींमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे बहिणींनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर, हा प्रश्न निर्माण होत आहे.

गेल्या काही तासांच्या अवधीत समोर आलेल्या दोन धक्कादायक घटनांनी नागपूरकरांची मान शरमेने खाली गेली आहे. पहिल्या घटनेत १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मावस भावाने अत्याचार केला, तर दुसऱ्या घटनेत इतवारी भागात भरदिवसा एकाने तरुणीची छेड काढत तिच्याशी चाळे करण्याचा प्रयत्न केला. पोलीस डायरीतल्या नोंदी काढून पाहिल्या तर दररोज अशा घटनांचे सत्र शहरात सुरू असल्याचे दिसते.

मावस भावानेच केला अत्याचार

नागपुरातील एमआयडीसी परिसरात मावस बहिणीवर अत्याचार करणाऱ्या अतुल उर्फ दिनेश यादव या नराधमाला पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी आणि हा अत्याचारी तरुण एकाच गावातील रहिवासी असून मुलगा हा मुलीचा मावस भाऊ आहे. हे कुटुंब उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी आहे. पिडीत मुलीचे कुटुंब मजुरीच्या शोधात नागपूरला आले होते. अतुल गावात काहीच करत नसल्याने मुलीच्या वडीलांनी त्याला सोबत मजुरी करेल या भावनेने नागपुरात आणले होते. हे सगळे पीडित मुलीच्या घरी एकत्र राहत होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा अल्पवयीन मुलीचे पालक मजुरीसाठी बाहेर गेले तेव्हा ती घरात एकटी असल्याची संधी साधत अतुलने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याने मुलीला याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतरही अतुल मुलगी आणि तिच्या धाकट्या बहिणीलाही छळत होता. अखेर अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवत कुटुंबाला माहिती दिली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अतुलला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतवारीतील दिवसाढवळ्या छेड

दुसऱ्या घटनेत शहरातील सर्वात वर्दळीच्या भाग इतवारीत रविवारी दुपारी १२:३० वाजता एका विक्षिप्त तरुणाने २४ वर्षीय तरुणीची छेड काढत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलगी किराणा दुकानातून सूपचे पॅकेट खरेदी करून परतत होती. त्यावेळी ३० ते ३५ वयोगटातील वाटसरूने तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य केले. तिच्या मैत्रिणीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळाला. मुलीने तहसील पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इतवारीसारख्या गर्दीच्या परिसरात ही घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. पोलीस छेड काढणाऱ्या विक्षिप्ताचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.