काळानुरूप लोकांच्या बदलत्या गरजा आणि दैनंदिन राहणीमानात झालेला बदल ओळखून शहरांच्या ठिकाणी मॉल्स संस्कृती हल्ली चांगलीच फोफावली आहे. उपराजधानीही त्यात मागे नाही. एकाच ठिकाणी अनेक वस्तू मिळतात म्हणून खरेदीसाठी महिला मॉल्समध्ये जाण्याला पसंती देतात. मात्र, तेथील प्रसाधनगृह, सुरक्षा आणि वाहनतळाच्या अभावामुळे त्यांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’ने शहरातील काही प्रमुख मॉल्सला भेट दिली असता तेथे अनेक असुविधा दिसून आल्या. व्हेरायटी चौकातील मॉलमध्ये वाहनतळाच्या समस्येला महिलांना तोंड द्यावे लागते. तळघरात बऱ्यापैकी उतार असलेल्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्यात महिलांना अडचणी येतात.

शुक्रवारी तलावानजिकच्या मॉलमध्येही परिस्थिती वेगळी नाही. तेथे शनिवारी जुन्या वस्तूंचा बाजार भरत असल्याने वाहने ठेवण्यासाठी किंवा काढण्यासाठी जागा नसते. त्यामुळे शनिवारी तेथे तुलनेने गर्दी कमी असते. त्या तुलनेत अलंकार सिनेमागृहासमोरच्या सेंट्रल मॉलमध्ये वाहनतळासाठी जागा असल्याने ग्राहक तेथे गर्दी करतात. मॉल्सच्या समोर किंवा बाजूला तळमजल्यावर वाहनतळ असेल तर महिला जास्त पसंती देतात. याशिवाय शहरात नव्याने तयार झालेल्या बैद्यनाथ चौकातील मॉल्समध्येही वाहनतळ इतक्या खाली आहे की, एकट्या महिलेला येथे वाहन ठेवायला जाणे भीतिदायक ठरते. येथील बाकी सर्व सुविधा चांगल्या असल्या तरी वाहनतळामध्ये महिला सुरक्षा रक्षक असावे, अशी अपेक्षा काही महिलांनी व्यक्त केली.

महिला सुरक्षा रक्षक असणे आवश्यक

ग्राहकांची वर्दळ असेल तर सुरक्षित वाटते. मात्र, कधीकधी वाहनतळ, सुरक्षा किंवा प्रसाधनगृहे असूनही मॉल्सचा अवाढव्य परिसर एकट्या महिलेसाठी भीतिदायक ठरतो. एम्प्रेस मॉल किंवा इटर्निटीमध्ये तळघरात महिलांनी वाहन घेऊन जाणे फारच अवघड आहे. रात्री थोडासा उशीर झाल्यास एकटी महिला त्याठिकाणी वाहन घेऊन जाऊच शकत नाही. मॉल्समध्ये महिला विक्रीप्रतिनिधी असल्यास ते खरेदी करणाऱ्या महिलांच्या सोयीचे असते. अगदी प्रसाधनगृह, सॅनिटरी नॅपकीन किंवा ‘कॉमन’रूमविषयी महिला दुसऱ्या महिलेला विचारणे पसंत करते, असे आयआयटी कंपनीमध्ये नोकरीला असणाऱ्या सुप्रिया भालाधरे यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur womens face many issues in malls right from security to washrooms scsg
First published on: 17-06-2022 at 12:10 IST