अमरावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. जुलै महिन्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. आता त्यावर भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबीयातील दुरावा संपल्याचे पाहून एक महिला म्हणून आपल्याला आनंद होत आहे. पण, ज्या परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले, त्यातून या दोघांमधील राजकीय स्वार्थ दिसून आला आहे. ते नाईलाजाने सोबत आले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा हे दोघे बंधू एकत्र आले असते, तर ते बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकत्र आले, असा संदेश लोकांमध्ये गेला असता. पण, आज ते एकत्र आले, त्यातून एकच स्वार्थ दिसत आहे. जेव्हा सत्ता हातून निघून जाते, तेव्हा नाईलाजापोटी काही निर्णय घ्यावे लागतात. एकमेकांचे चेहरेही न पाहणारे ठाकरे परिवारातील सदस्य हे एकत्र दीपोत्सव साजरा करीत आहेत. ‘मजबुरी का नाम ठाकरे परिवार’ याच दृष्टीने या दोन्ही नेत्यांकडे बघितले जात आहे.

नवनीत राणा म्हणाल्या, निवडणूक आयोगावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. लोकसभा निवडणूक निकाल आल्यानंतर लोकशाही जिवंत असल्याचे हेच लोक सांगत होते. मग आज लोकशाही कुठे गेली, असा माझा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला भरघोस यश मिळाले आणि आमचे सरकार स्थापन झाले.

आता विरोधकांना आपले भविष्य अंधारात दिसत आहे, म्हणून आता त्यांनी अनेक गोष्टी सूचत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी आमच्या मतांची चोरी केली, असेही आम्ही म्हणू शकतो. एकतर चोरी करायची आणि नंतर मुजोरी करायची, अशी महाराष्ट्रातील विरोधकांची अवस्था झाली आहे, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

विरोधकांना काहीच काम उरलेले नाही. सकाळी ९ वाजता एक पोपट सुरू होतो. त्याच्या पाठीमागे इतर लोक बोलू लागतात. त्यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर फारसा पडणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ‘न भुतो न भविष्यती’ अशी मदत दिली आहे, असा दावा नवनीत राणा यांनी केला.