गडचिरोली : सध्याच्या घडीला सशस्त्र संघर्ष शक्य नसून शस्त्रसंधी हाच एकमेव पर्याय असल्याचा पुनःरूच्चार नक्षलवादी संघटनेच्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा ज्येष्ठ सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ अभय याने पत्रकाच्या माध्यमातून केला आहे. त्याच्या या भूमिकेला विरोध करणाऱ्या तेलगाणा राज्य समिती प्रवक्ता जगन याला देखील त्याने संघटनेतील विविध ठरावांची आठवण करून देत खडेबोल सुनावले आहे. देशातील अतिडाव्या चळवळीच्या इतिहासात प्रथमच इतक्या ठळक स्वरूपात संघटनेतील फूट उघड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दलांची मोहीम जोमाने सुरू असतानाच, चळवळीतील सर्वोच्च नेत्यांमध्ये सशस्त्र संघर्षाच्या भवितव्यावरून गंभीर मतभेद चव्हाट्यावर आले आहे.

भूपती याने तेलुगू भाषेत लिहिलेल्या या प्रसिद्धी पत्रात, जनता हेच अंतिम न्यायाधीश आहे,” असे ठामपणे नमूद केले आहे. सशस्त्र संघर्ष तात्पुरता थांबवण्याची भूमिका घेतल्याबद्दल जगन यांनी त्यांच्यावर केलेली टीका फेटाळून लावत त्याने संघटनेच्या वर्तमान धोरणांवर पुनर्विचार करण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. पक्षाचे महासचिव नंबाला केशवराव यांनी शांतता चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याने व इतर काही सहकाऱ्यांनी तात्पुरत्या शस्त्रसंधीबाबत विचार मांडला होता. मात्र, जगनने या मतांचा विपर्यास करून वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला, असा पलटवार त्याने केला आहे.

भूपतीच्या मते, मागील दशकभरात नक्षल चळवळीला मोठा फटका बसला आहे. महासचिव व केंद्रीय समितीच्या नेत्यांसह शेकडो सदस्य मारले गेले. अनेकांनी आत्मसमर्पण केले. यादरम्यान संघटनेला तळागाळातला जनाधार अपेक्षित प्रमाणात वाढवता आला नाही. परिणामी चळवळीला चारही बाजूने मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे ‘दीर्घकालीन जनयुद्ध’ ही जुनी रणनीती सध्याच्या भारतीय सामाजिक–राजकीय परिस्थितीत अप्रासंगिक ठरत असून, आता थेट शस्त्रास्त्रांऐवजी जनतेमध्ये जाऊन जनाधार मजबूत करणे हीच खरी दिशा असली पाहिजे, असे त्याचे मत आहे.

नोव्हेंबर २०२४ मध्ये केंद्रीय समितीच्या काही सदस्यांनी शांतता चर्चेचा प्रस्ताव फेटाळला होता. मात्र, तेलंगणातील काही सदस्यांनी मार्च २०२५ मध्ये उलट शांतता चर्चेस समर्थन दर्शवले. तेव्हापासूनच चळवळीत मतभेदाची सुरुवात झाली होती. असा उल्लेख भूपतीने केला आहे.

गडचिरोली आणि उत्तर बस्तर विभागाचे भूपतीला समर्थन

शस्त्रसंधीच्या चर्चेवरून नक्षलवादी संघटनेत वादळ उठले असताना नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन आणि छत्तीसगडमधील उत्तर बस्तर डिव्हिजनच्या नेत्यांनी २७ आणि २८ सप्टेंबरला पत्रक जारी करून भूपतीच्या निर्णयाला समर्थन दर्शवले आहे. पाहिल्यांदाच चळवळीच्या कनिष्ठ पातळीवरून अशाप्रकारचे वक्तव्य येण्याने संघटनेतील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. उत्तर बस्तर कमिटीचा प्रवक्ता सुखदेव कवडो आणि गडचिरोली डिव्हिजनचा प्रवक्ता कमलसाय वेलादी, कंपनी १० चा कमांडर निखिल आणि टेक्निकल विभागप्रमुख मैनू यांनी संयुक्तपणे हे पत्रक काढले आहे. चळवळीतील फुटीच्या पार्श्वभूमीवर २ ऑक्टोबरला त्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यात तब्बल १०३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षलवाद्यांना आणखी एक मोठा धक्का बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात भूपती काही महत्त्वाच्या सदस्यांसह तेलंगणातील हैदराबाद येथे आत्मसमर्पण करू शकतो.