गडचिरोली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकिस्तानात शिरून तेथील अनेक दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यानंतर पाकिस्तानी लष्कराने केलेल्या कुरापतींना भारतीय सैन्यानेही सडेतोड उत्तर दिले. भारतीय वायुदलाने पुन्हा पाकिस्तानात शिरून हवाई तळे उद्ध्वस्त केली. यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध कमालीचे ताणले गेले आणि युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे शस्त्रसंधीसाठी गळ घातली. त्यानंतर भारताने शस्त्रसंधीची घोषणा केली.
मागील दोन वर्षांपासून छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड येथे नक्षलवादाविरोधात सुरू असलेल्या आक्रमक कारवायांमुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. केंद्रीय समिती सदस्य अभय उर्फ सोनू भुपती याने यासंदर्भात माध्यमांना प्रसिद्धी पत्रक पाठवून कारवाया रोखण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले होते. दोन दशकानंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांनी अशा प्रकारे शांतीप्रस्ताव पुढे केला होता.
२४ मार्च रोजी हैदराबाद येथे एक गोलमेज बैठक घेण्यात आली होती. त्यात मध्य भारतात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यात येऊन शांतीवार्ता केली पाहिजे, असे ठरविण्यात आले होते. गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार, अशी घोषणा केल्यानंतर छत्तीसगड, गडचिरोली, तेलंगणा, ओडीशा आणि झारखंड राज्यात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान करण्यात आले. यादरम्यान झालेल्या चकमकींत शेकडो नक्षलवादी मारले गेलेत. शेकडो कारागृहात आहेत.

इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारल्या गेल्याचा दावाही भुपतीने या पत्रकात केला होता. ‘कगार’च्या नावावर केंद्र आणि राज्य सरकारांनी नक्षल प्रभावित क्षेत्रात अघोषित युद्ध सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी दोनदा चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले पण आमच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही, असा आरोप नक्षलवाद्यांनी केला होता.

केंद्र सरकार नक्षलविरोधी कारवाया थांबविण्यास तयार असतील तर आम्ही शांतीवार्ता करण्यास तयार आहोत, असे नक्षल चळवळीतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता अभय उर्फ सोनू भूपती याने तेलुगु भाषेत प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटले होते. यानंतर अलीकडेच २१ मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाड जंगल परिसरात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू ठार झाला. त्याच्यासोबत आणखी २६ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले.

या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झाेनल कमिटीचा प्रवक्ता विकल्प याने २५ मे राेजी तीन पानांचे पत्रक जारी केले. त्यात त्याने बसवराजूच्या मृत्यूची कबुली दिली. शिवाय, भारताने पाकिस्तानविरुद्ध शस्त्रसंधी जाहीर केल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकात पंतप्रधानांचा उल्लेख करीत विकल्प याने पाकिस्तानविरोधात शस्त्रसंधी का केली, असा प्रश्न विचारला आहे. पाकिस्तानविरुद्ध शस्त्रसंधी केलेली असतानाही तिरंगा यात्रा का काढली जात आहे, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला आहे.