नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) चिंतन शिबिराच्या एक दिवसाआधी या पक्षाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांची तोफ नागपुरात धडाडणार आहे. समता परिषदेच्या ओबीसी मेळाव्यातील भुजबळांच्या भूमिकेचे राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात पडसाद उमटणार असल्याने ते नेमके काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.
विदर्भात ओबीसींची लोकसंख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समजाला कुणबी जाती प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय चिंतन शिबीर नागपुरात शुक्रवारी होत आहे. त्यापूर्वी उद्या, गुरुवारी समता परिषदेचा ओबीसी मेळावा नागपुरात होत आहे. छगन भुजबळ यांनी हैदराबाद गॅझेटच्या जी.आर.ला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय येथे आहे. हे शहर राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकत असते. राष्ट्रवादीने चिंतन शिबिरासाठी आणि छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यासाठी नागपूर शहराची निवड केली आहे. हा योगायोग असू शकत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमध्ये आहे आणि छगन भुजबळत्यात मंत्री आहेत. त्यामुळे ते ओबीसी बहुल विदर्भात सरकारबाबत काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.
गुरुवारी दुपारी ३ वाजता, महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथे ओबीसी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात भुजबळ मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर १९ सप्टेंबरला एम्प्रेस पॅलेस, वर्धा रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, पदाधिकारी असे सुमारे पाचशेहून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती, युवा आणि महिला केंद्रित धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी बूथ रचना यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर विचारमंथन केले जाणार आहे. पक्षाची आजवरची आणि भविष्यातील वाटचाल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व त्यातील यश यावर सखोल चर्चा होणार आहे.
या चिंतन शिबिरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येईल. नागपूरसह संपूर्ण विदर्भात आगामी निवडणुकांमध्ये यश कसे मिळवायचे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच स्थानिक पातळीवर महायुती करण्याबाबत पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले जाईल आणि त्यावर आवश्यक उपाययोजना सुचवल्या जातील. या चिंतन शिबिराची सुरुवात नागपूरमधून होत असून यानंतर प्रत्येक विभागात अशाच बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.