लोकसत्ता टीम

अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. कार्यकर्ते देखील तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोचरी टीका केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्याने पाण्याने धुतल्याचा प्रकार जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी असताना नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. मैदानावरील चिखलामुळे नाना पटोले यांचे पाय मातीने माखले होते. ते नागपूरकडे रवाना होण्यासाठी तातडीने त्यांच्या वाहनाकडे गेले. मात्र, त्यांचे पाय मातीने माखलेले असल्याने त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी बोलावले. आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने धुतले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी विजय गुरव असे काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेण्याच्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली.

आणखी वाचा-अकोला : गरिबांच्या साड्यांमध्ये देखील दलाली, नाना पटोले यांची सत्ताधाऱ्यांवर टीका; अपशब्दांचा वापर

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “कदाचित पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहायला मिळाला. नेते अशा प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर निंदाजनक गोष्ट आहे. यातून पक्षाचे धोरण काय हे दिसून येते. अतिशय संतापजनक हा प्रकार आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे, हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. नाना पटोले यांनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने आपल्या हाताने पाण्याने धुतल्याची कृती केली. या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. नवा वाद निर्माण झाला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. या कृत्यानंतर राजकीय वर्तुळात देखील चर्चेला पेव फुटले. नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.