चंद्रपूर : शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉग्रेस व उध्दव ठाकरे शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळात छोटा फेरबदल होऊ शकतो. मोठ्या बदलाचे कुठलेही संकेत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा मंत्रीमंडळात समावेश असावा, ही आमची आग्रही मागणी आहे असे मत भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

यंग रेस्टॉरंट येथे आयोजित पत्रपरिषदेत आमदार जोरगेवार यांच्यासोबत ओबीसी नेते डॉ.अशोक जीवतोडे, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, तुषार सोम, छबु वैरागडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरगेवार यांनी मंत्रिमंडळात फार मोठे बदल होण्याची शक्यता फेटाळून लावली. मुख्यमंत्री, राज्यातील पक्ष नेतृत्व तसेच जी काही राजकीय माहिती आहे, त्या आधारावर सध्या तरी मंत्रीमंडळात मोठा बदल नाही, एक दोन वादग्रस्त मंत्र्यांबाबत वाद आहे. त्यामुळे फेरबदल झाला तरी छोटेखानी बदल होईल, असे जोरगेवार म्हणाले. आज घडीला भाजपात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेस व उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बदल होवू शकतो, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या वाढदिवसानिमित्त २० ते २९ जुलै या कालावधीत देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आतापर्यंत ३६८ कार्यक्रम घेण्यात आले. येत्या काळात राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री अशोक उईके, मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. तसेच अतिशय पुरातन अशा शिवलिंग पुजेसाठी मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस चंद्रपूर येथे येणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री मोहळ यांना सायकल वितरण कार्यक्रमासाठी निमंत्रीत केले असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशांत कोरटकर पळपुटा

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणारा प्रशांत कोरटकर हा पळपुटा आहे. या शब्दात आमदार जोरगेवार यांनी टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र चुकून एका फलकात टाकायला विसरले. ही चुक संबंधित बॅनर तयार करणाऱ्याची आहे. मात्र कोरटकर यांनी समाज माध्यमावर आपल्याबद्दल पोस्ट टाकून खोडसाळपणा केला. यापूर्वी मुख्यमंत्री चंद्रपूर जिल्ह्यात येत होते. तेव्हा कधीच बॅनर, पोस्टर लागत नव्हते. आपण स्वत: मुख्यमंत्र्यांचे स्वागत फलक लावण्यास सुरूवात केली. पळपुट्या कोरटकर याला ही बाब खटकली. असेही जोरगेवार म्हणाले.