नागपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकार विरोधातील लढय़ाचे नेतृत्व कोणी करावे, हा मुद्दाच नाही. पण लोकांना पर्याय हवा आहे आणि तो देण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पवार यांच्या तीन दिवसीय विदर्भ दौऱ्याला  नागपुरातून सुरुवात झाली.  तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मोदींना पर्याय देण्यासंदर्भात सुरू असलेल्या हालचालींबाबत विचारलेल्या प्रश्नावर  उत्तर देताना  पवार म्हणाले,  मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधातील लढय़ाचे नेतृत्व कोणी करावे  हा मुद्दा नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावे की आणखी कोणी हा विषयच नाही. पण, एक पर्याय देणे आवश्यक आहे. लोकांची तशी इच्छा आहे आणि पर्याय उभा करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य राहणार आहे.

‘अनिल देशमुखांच्या अपमानाची किंमत चुकवावी लागेल’

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दोष  नसताना केवळ बदनामीसाठी तपास यंत्रणामार्फत त्यांचा छळ केला जात आहे. त्यांना कारागृहात टाकण्यात आले. त्यांच्या कारागृहातील एकेक दिवसाची, एकेक तासाची किंमत विरोधकांना चुकवावी लागेल असा इशारा पवार यांनी दिला आहे