लोकसत्ता टीम

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीपूर्वी अपूर्णावस्थेत उद्घाटन करण्यात आलेले येथील नवीन बसस्थानक पाच महिन्यांतच समस्यांचे आगार बनले आहे. उन्हाळ्याची तीव्रत वाढली असताना बसस्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाण्याची सोय अद्यापही करण्यात आली नाही. लहान बाळांना दूध पाजण्यासाठी असलेला हिरकणी कक्ष बंद असल्याने बाळांची आबाळ होत आहे.

येथील जुने बसस्थानक हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना म्हणून ओळखले जायचे. मात्र नावीन्याचा ध्यास घेतलेल्या महायुती सरकाने २०१८ मध्ये जुने बसस्थानक पाडून नवीन बसस्थानक बांधण्याचा घाट घातला. दिलेल्या मुदतीपेक्षा बऱ्याच कालावधीनंतर अखेर हे बसस्थानक पूर्णत्वास गेले. अशातच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसस्थानक अर्धवट अवस्थेत असतानाच त्याचे लगबगीने उद्घाटन करण्यात आले. अद्यापही या बसस्थानकात किरकोळ कामे सुरूच आहेत. गाजावाजा करून सुरू केलेले हे बसथानक पूर्वीपेक्षाही बंदिस्त झाले.

बसस्थानकातील प्लॅटफॉर्म अत्यंत दाटीवाटीचे आहेत. येथे येणाऱ्या आणि मुक्कामी राहणाऱ्या बस परिसरातून ने-आण करताना चालकांची दमछाक होत आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या आत अपघातांची शक्यता नाकारता येत नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. यवतमाळचे बसस्थानक विमानतळासारखे राहील अशा वल्गना स्थानिक नेत्यांनी केल्या होत्या. प्रत्यक्षात एखाद्या तालुकास्तरावरील स्थानकासारखे हे बसस्थानक झाले आहे, अशी टीका आता होत आहे.

सध्या तीव्र उन्हाळा सुरू आहे. मात्र बसस्थानकात अद्यापही थंड पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना बाटलीबंद पाणी घेवून तहान भागविण्याचा भूर्दंड बसत आहे. लहान मुलांना दूध पाजता यावे, यासाठी हिरकणी कक्ष येथे तयार करण्यात आला. मात्र तो कुलूपबंद आहे. येथील अधिकारी, कर्मचारी प्रसाधनगृह म्हणून या कक्षाचा उपयोग करत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

बसस्थानक परिसरातील अस्वच्छता, शौच्छालयातील अस्वच्छता यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आल्याची ओरड होत आहे. मात्र स्थानिक आगार प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना बसस्थानकात अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. बसस्थानकातील समस्यांचा पाढा मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे वाचला. या समस्या तत्काळ सोडविल्या नाही तर मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिवहन महामंडळाला ‘नाथजल’चा नाद!

येथील बसस्थानकात थंड पाणी उपलब्ध न करण्यामागे परिवहन महामंडळाचे ‘नाथजल’ कंपनीवर असलेले प्रेम कारणीभूत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. नाथजल या कंपनीला प्रवेशदारावरच मोठे शेड बांधून दिले. हे शेडही चुकीच्या जागेवर बांधल्याने येथे अपघाताची भीती असल्याची शक्यता मनसेने व्यक्त केली. नाथजल कंपनी १५ रूपयाची पाण्याची बॉटल २० रूपयांना विकून प्रवाशांना लुटत असल्याचा आरोप मनसेने केला. शौचालयातही पाच रूपयांऐवजी सर्रास १० रूपये घेवून प्रवाशांची पिळवणूक करण्यात येत असल्याचा आरोप आहे. दक्षता समिती व आगार व्यवस्थापकांच्या संगनमताने हे सर्व सुरू असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापूरे यांनी केला आहे.