वर्धा: जंगलचा राजा म्हणून मान्य वाघाचे संगोपन व संवर्धन करण्याची बाब ही एक जबाबदारी म्हणून पाहल्या जाते. हा उमदा प्राणी देशाचे वैभव म्हणून देशात ठिकठिकाणी टायगर प्रोजेक्ट निर्माण करण्यात आले. त्याचा फायदा दिसून आला. वाघ संख्या वाढत असल्याची आकडेवारी पण आहे. पण मनुष्य व वाघ यांच्यातील संघर्ष पण चर्चेत असतो. हे टळावे म्हणून पुढील पिढीस जागृत करण्याचा प्रयत्न होत असतो. वाघाची गरज आहे, हे विविध पद्धतीने पटवून दिल्या जाते. वर्धा जिल्ह्यात वाघाची संख्या लक्षनीय आहे. देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर टायगर प्रोजेक्ट ओळखल्या जातो.
आज २९ जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तरी किमान प्रबोधन व्हावे म्हणून अकोला येथील निसर्गकट्टा या पर्यवरण प्रेमी संस्थेने शाळेतून पर्यावरण प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन शाळांना केले आहे. वाघ आहे तर जंगल आहे, जंगल आहे तर पाणी आहे, पाणी आहे तर जीवन आहे. वाघ वाचवा, जीवन वाचवा. असा संदेश ही प्रतिज्ञा देते. मी माझ्या वृक्षवल्ली, वन्यजीव, सभोवतालचा जल, मृद, व वायू या घटकास सांभाळणाऱ्या पर्यावरणाचा मान ठेवील. माझ्या देशातील नैसर्गिक संपदा आणि पर्यावरण यांचा सुसंगत शाश्वत विकास करण्याची मी प्रतिज्ञा घेत आहे. या समृद्ध जैव विविधतेचे जतन भावी पिढीसाठी करण्यातच माझे सौख्य सामावले आहे. अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन निसर्ग कट्टाचे अमोल सावंत करतात.
दुसरीकडे वर्धा वन विभागाने वाघ व गावकरी संघर्ष टाळण्यासाठी व्याघ्र मित्र संकल्पना राबविली आहे. काही गावकरी व विद्यार्थी यांना व्याघ्र मित्र म्हणून जबाबदारी दिली. ते गाव वन विभाग यांच्यात समन्वय साधण्याचे कार्य करतात. वादाचा प्रसंग उद्भवल्यास सामोपचार करण्याची भूमिका घेतात. वाघाचा वावर दिसून आल्यास वन अधिकाऱ्यांना सूचित करतात. त्यांची मोलाची मदत होत असल्याचे वन अधिकारी गावंडे सांगतात. या व्याघ्र मित्रांना थोडे बहुत मानधन पण दिल्या जात आहे.
गावाकऱ्यांचे उदबोधन पण केल्या जाते. जंगल लागून शेती असल्यास पिकात निमूटपणे जाऊ नये. आवाज करावा. मोठ्याने बोलावे. रेडिओ सूरू ठेवावा. जोरजोरात बोलावे. म्हणजे वाघ सतर्क होतो. त्याच्या हालचाली वाढतात. त्यामुळे हल्ले टळतात. तसेच अनेक गावात वाघाचे मुखवटे वाटण्यात आले आहे. टे चेहऱ्याच्या उलट दिशेने लावल्या जातात. त्यामुळे वाघ ते पाहून थेट हल्ला करीत नसल्याचा युक्तीवाद होतो. असे बरेच उपाय करीत वाघास अभय व गावकऱ्यास सुरक्षा देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितल्या जाते.